सामना अग्रलेख – वांगचुक यांच्या लढ्याचे महत्त्व!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम वांगचुक हे लडाखच्या हिमालयातून दिल्लीत आले व त्यांनी देश वाचविण्याची हाक दिली. देशाला वाचविण्याची लढाई म्हणजे ‘अडथळा’ असे ज्यांना वाटते तेच देशाचे दुश्मन आहेत. लडाखमधील जमिनीवर कब्जा करून तेथील आदिवासींचे जनजीवन नष्ट करायचे, त्या जमिनींचा अदानींना कब्जा देऊन तेथे पर्यावरणास मारक उद्योग टाकायचे ही लूट आहे. वांगचुक यांनी त्याविरोधात आवाज उठवला तर ते मोदी यांना नकोसे झाले. आपल्या हक्कांसाठी लढणे हा स्वतंत्र भारतात गुन्हा ठरतो आहे. वांगचुक यांची लढाई आपल्या सगळ्यांची आहे. मनोज तिवारीसारख्यांना त्याचे महत्त्व कळणार नाही!

ज्या पंतप्रधान मोदी यांनी सोनम वांगचुक यांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी डोक्यावर घेतले, त्याच वांगचुक यांच्या विरोधात भाजप आज बदनामीच्या मोहिमा राबवत आहे. ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीविरुद्ध शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी वांगचुक उपोषणाला बसले. 20 दिवसांनंतरही उपोषण सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही ही त्यांची जिद्द आहे. देशासाठी बलिदान देण्याच्या सज्जतेनेच वांगचुक ‘जंतर मंतर’च्या मैदानात उतरले आहेत. वांगचुक यांच्या उपोषणामुळे सरकारची कोंडी झाली आहे, पण मोदींचा अहंकार धर्मेंद्र प्रधानांना वाचवत आहे. वांगचुक ऐकत नाहीत हे समजल्यावर भाजपने त्यांच्या बदनामीची मोहीम सुरू केली. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी सांगितले की, ‘‘कोण वांगचुक? ते आम आदमी गँगचे सदस्य आहेत. भारताच्या विकासात वांगचुक अडथळे आणत आहेत. जनता त्यांना धडा शिकवेल.’’ हे सर्व कोण सांगत आहे तर मनोज तिवारी. भोजपुरी चित्रपटात अश्लील, संस्कृतीहीन गाण्यांवर नाचणारा हा माणूस हे बोलतो आहे व भाजपकडून मनोज तिवारीला रोखले जात नाही. राममंदिरातील चोरीचे समर्थन करणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? मंदिराच्या दानपेटीतला पैसा हिंदूंनीच चोरला. त्यामुळे कुणाच्या पोटात का दुखावे? असा तर्क मांडणारे हे लोक सोनम वांगचुक यांच्या विरोधात बोलत आहेत. ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीने लाखो विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले. 20-25 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, पण मोदी यांच्या राज्यात जिवाची किंमत उरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी मरू द्या, शेतकरी मरू द्या, पुलवामात भारतीय सैनिक मरू द्या, कश्मीरात पर्यटक मरू द्या. लोकांच्या मरणाचे यांना काही पडलेले नाही. त्यामुळे 20 व्या दिवशी कठोर उपोषणाने जर्जर झालेल्या वांगचुक यांच्या विषयी

भाजपच्या संवेदना मेल्या

आहेत. वांगचुक यांच्या सोबत नेहा नावाची एक विद्यार्थिनी 20 दिवसांपासून उपोषण करत आहे. तिचे उपोषण आणखी एक दिवस वाढले तर तिचे प्राण जातील अशी चिंता डॉक्टरांना वाटते, पण अशी चिंता पंतप्रधान मोदींना वाटते काय? मोदी असे वागतात हा कुसंगतीचा परिणाम आहे. गाझा पट्टीत 50 हजार लहान बालकांची कत्तल करणारे नेतान्याहू व इराणच्या शाळेवर बॉम्ब टाकून 200 मुलांचे प्राण घेणारे प्रे. ट्रम्प यांच्यासारखे राज्यकर्ते पंतप्रधान मोदींचे आदर्श आहेत. मोदी त्यांना मिठ्या मारतात. त्यामुळे वांगचुक यांच्या उपोषणाबाबत मोदी यांना काही वाटत असेल हा विचार निरर्थक आहे, पण मोदी मंत्रिमंडळातील इतर लोकही इतके अमानुष व नामर्द बनले आहेत काय? हेच लोक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या वेळी दिल्लीच्या रस्त्यावर समर्थनार्थ मोर्चे काढीत होते. एकही मर्द ‘माई का लाल’ मोदी मंत्रिमंडळात निपजू नये की, ज्याने वांगचुक यांच्या समर्थनार्थ मंत्रीपदाचा राजीनामा फेकून ‘जंतर मंतर’वर यावे. स्वतः मोदी हे ‘मेलोडी’ चॉकलेटचा पुडा घेऊन इटलीच्या सुंदर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीला जातात, पण आपल्या घरापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या वांगचुक यांच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन जायला तयार नाहीत. हे क्रौर्य आहे, अहंकार आहे. हाच अहंकार रावणाचा, दुर्योधनाचा, हिटलरचा आणि इदी अमीनचाही होता. सिकंदर, नेपोलियनचाही होता. त्या अहंकाराची शेवटी माती झाली. औरंगजेबाचा अहंकार याच मातीत गाडला गेला. त्यामुळे वांगचुक यांच्या उपोषणाच्या निमित्ताने भाजपचा जो अहंकार फसफसत आहे तोसुद्धा नष्ट होईल. भाजपवाले म्हणतात, वांगचुक हे आम आदमी पार्टी गँगचे सदस्य आहेत. याच आम आदमी पार्टीने ‘रामलीला’ मैदानावर अण्णा हजारे यांचे उपोषण अकरा दिवस चालवले तेव्हा केजरीवाल यांची भगतगिरी भाजपही करत होता. हे साऱ्या देशाने पाहिले. भाजपही तेव्हा आम आदमी पार्टी गँगचा सदस्य होताच.

आम आदमी पार्टी म्हणजे

‘अल कायदा’ नाही. वांगचुक यांनी लडाखमध्ये घुसलेल्या चिनी सैन्याचा मुद्दा उपस्थित केल्यापासून भाजपच्या दृष्टीने ते देशद्रोही ठरले. वांगचुक यांना भारत सरकारने ‘पद्म’ पुरस्कार देऊन सन्मानित केले ते त्यांनी केलेल्या पर्यावरण, शिक्षण क्षेत्रातल्या भरीव कार्यामुळे. हिमालयाच्या अतिथंड आणि दुर्गम भागात देशाच्या सुरक्षेसाठी पहारा देणाऱ्या भारतीय जवानांसाठी सोनम वांगचुक यांनी सौर ऊर्जेवर चालणारे ‘इन्सुलेटेड तंबू’ तयार केले. बाहेरील तापमान ‘-14’ असले तरी या तंबूच्या आत तापमान ‘+15’ अंश राखले जाते. या संशोधनामुळे जवानांना बर्फाचा मारा, कडाक्याच्या थंडीपासून मोठा दिलासा मिळाला आहे. सोनम वांगचुक यांच्या कामाचा गौरव जागतिक पातळीवर झाला आहे. या सन्मानाचा ते कोणत्या राजकीय ‘गँग’चे सदस्य आहेत याच्याशी संबंध नाही. सोनम वांगचुक यांनी त्यांचे प्राण पणाला लावले आहेत ते देशातील युवा पिढीच्या भविष्यासाठी. भारतातील शिक्षण पद्धती, परीक्षा हा एक फार्स बनला आहे. अयोध्येतील राममंदिरात भाजपचे चोर घुसले तसे राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेच्या यंत्रणेतही त्यांचे चोर घुसले व पेपर फोडून हाहाकार माजवला. देशाचा पाया उखडून फेकण्याचा हा डाव आहे. सोनम वांगचुक हे लडाखच्या हिमालयातून दिल्लीत आले व त्यांनी देश वाचविण्याची हाक दिली. देशाला वाचविण्याची लढाई म्हणजे ‘अडथळा’ असे ज्यांना वाटते तेच देशाचे दुश्मन आहेत. लडाखमधील जमिनीवर कब्जा करून तेथील आदिवासींचे जनजीवन नष्ट करायचे, त्या जमिनींचा अदानींना कब्जा देऊन तेथे पर्यावरणास मारक उद्योग टाकायचे ही लूट आहे. वांगचुक यांनी त्याविरोधात आवाज उठवला तर ते मोदी यांना नकोसे झाले. आपल्या हक्कांसाठी लढणे हा स्वतंत्र भारतात गुन्हा ठरतो आहे. वांगचुक यांची लढाई आपल्या सगळ्यांची आहे. मनोज तिवारीसारख्यांना त्याचे महत्त्व कळणार नाही!