ठसा – एस. जानकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< दिलीप ठाकूर
[email protected]

ऐंशी-नव्वदच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या गीत संगीताच्या चाहत्यांना अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी ‘हिफाजत’ (संगीतकार राहुल देव बर्मन) या चित्रपटातील ‘बटाटा वडा’ हे गाणे अथवा अनिल कपूर आणि अमृता सिंग यांनी ‘साहेब’ (संगीतकार बप्पी लाहिरी) या चित्रपटात रंगतदार नृत्य केलेले ‘यार बिना चैन कहा रे’ ही गाणी नक्कीच माहिती आहेत. ही गाणी गायलेल्या पार्श्वगायिका म्हणजे एस. जानकी.

एखादा कलाकार भाषेच्या सीमा ओलांडून अधिकाधिक भाषांमधून आपली कला सादर करतो यातील उत्तम उदाहरण एस. जानकी. त्यांनी देश-विदेशातील मिळून तब्बल वीस भाषेतील गाणी गायली आहेत. त्यांनी सर्वाधिक गाणी कन्नड आणि मल्याळम भाषेत गायली आहेत. त्यासह हिंदी, तामीळ, तेलुगू, संस्कृत, ओडिशा, तुलू, उर्दू, पंजाबी, बडागा, बंगाली, कोकणी या भारतीय भाषांसह इंग्रजी, जपानी, जर्मन, सिंहली या विदेशी भाषेतील गाणी गायली. काही गाण्यांना संगीतही दिले. यातील काही भाषा त्या शिकल्या तर काही भाषेच्या रोमन लिपीचा वापर केला, पण आपल्या 88 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी बहुभाषिक, बहुसांस्कृतिक अशी अष्टपैलू संगीतमय वाटचाल केली. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1938 रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील पल्लापटला येथे झाला.

सिस्तला श्रीराममूर्ती जानकी हे त्यांचे मूळ नाव. त्या प्रेमाने ‘जानकी अम्मा’ या नावाने ओळखल्या जात. त्यांनी हिंदुस्थानी संगीताचे शिक्षण घेतले आणि मग जस जशी गायनाची संधी मिळत गेली, तस तसे नवीन गोष्टी शिकण्याची सकारात्मक दृष्टी कायम ठेवली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तामीळ चित्रपट ‘विधियन विलायट्ट’ (1957) या चित्रपटापासून त्यांनी पार्श्वगायन सुरू केले आणि 2017 सालापर्यंत त्या कला क्षेत्रात कार्यरत होत्या.

म्हणजे तब्बल पन्नास वर्षांची त्यांची वाटचाल आहे. त्यांनी चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, अल्बम, इव्हेंटस अशा विविध माध्यमांतून पार्श्वगायन केले. त्यात प्रेम गीत, विरह गीत, सणावाराचे गीत, वाढदिवस गीत, सहल गीत, शोकाकुल गीत अशा विविध मूडच्या गाण्यांचा समावेश आहे. नव्वदच्या दशकात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब करून येताना त्यातील अनेक गाण्यांना एस. जानकी यांचा आवाज आहे. ‘हमसे है मुकाबला’ (संगीत ए. आर. रेहमान) या चित्रपटातील ‘मुक्काला मुकाबला, फौलादी मुक्का’ (संगीत इलया राजा) या चित्रपटातील ‘मटकी लेके चलो’ ही गाणी त्यांनीच गायली आहेत. त्यांच्या या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी विविध राज्यांचे 33 पुरस्कार प्राप्त केले, तर 2013 साली त्यांनी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मभूषण पुरस्कार त्यांनी ‘हा पुरस्कार आपणास खूप उशिरा मिळत आहे’ असे म्हणत नाकारला. हा त्यांचा बाणेदारपणा विशेष उल्लेखनीय आहे.