
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे झालेली डिझेल दरवाढ व इतर वाढत्या खर्चाचा मोठा तडाखा एसटीच्या लाखो सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटीचा प्रवास तब्बल 13.56 टक्क्यांनी महागला आहे. इंधन दरवाढीमुळे बेजार झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 13.56 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्याचे महामंडळाने शुक्रवारी जाहीर केले. आर्थिक मदतीच्या बाबतीत सरकारने हात वर केल्यानंतर महामंडळाने ही कायमस्वरूपी भाडेवाढ लादली.
उन्हाळी हंगामात प्रवाशी वाहतुकीचे नियोजन व महसूलवाढीच्या उद्देशाने एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून साध्या बस सेवांच्या भाड्यात 10 टक्क्यांची हंगामी वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत 15 जूनला संपली. त्या वेळी इंधन दरवाढीमुळे वाढलेला खर्च व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ याचे कारण देत महामंडळाने हंगामी भाडेवाडीच्या निर्णयाला महिनाभराची मुदतवाढ दिली. पण महिनाभराच्या कालावधीतही इंधन दरवाढीच्या धक्क्यातून एसटी महामंडळ सावरले नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बुधवारी पुन्हा हंगामी भाडेवाढ 15 दिवसांसाठी वाढवण्याची घोषणा एसटी महामंडळाने केली. ती हंगामी भाडेवाढ शुक्रवारी मागे घेत असल्याचे महामंडळाने जाहीर करत 13.56 टक्क्यांच्या कायमस्वरूपी भाडेवाढीचा मोठा भुर्दंड सामान्य प्रवाशांच्या माथी मारला.
मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू
एसटी महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच भाडेवाढ लागू केली. ऐन सणासुदीच्या तोंडावरच महामंडळाने सर्वसामान्य प्रवाशांना या मोठय़ा भाडेवाढीचा धक्का दिल्याने प्रवाशी वर्गामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हंगामी भाडेवाढ केवळ साध्या बस सेवांसाठी होती. नवीन भाडेवाढ एसटीच्या सर्वच बस सेवांसाठी लागू झाली आहे.
मागील भाडेवाढीमुळे सुट्या पैशावरून वाहकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत होता. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने 5 रुपयांच्या पटीत भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. परिवहन मंत्र्यांकडे संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला होता. नवीन भाडेवाढ 5 रुपयांच्या पटीत झाल्याने वाहक आणि प्रवाशांमधील सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादाला पूर्णविराम लागला आहे, असे महाराष्ट्र एसटी कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.






























































