
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने जपान ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. उपांत्य फेरीत चीनच्या चेन युफेईला पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. जवळपास 44 मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूचे पूर्ण वर्चस्व होते. सिंधू 21-19, 15-10 अशी आघाडीवर असताना चौथ्या युफेईने सामना अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिंधू थेट फायनलमध्ये पोहोचली.
जपान ओपनमधील सिंधुची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण गेल्या सात वर्षांत सिंधुने पहिल्यांदाच टोकियो 2020 ऑलिम्पिकची चॅम्पियन चेन युफेईवर मात केली आहे. तसेच गेल्या काही काळापासून सिंधुला मोठ्या स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करता आली नव्हती. सिंधुने 2024 मधील सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेनंतर पहिल्यांदाच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप अवघ्या एका महिन्यावर आलेली असताना माजी जागतिक विजेती सिंधू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. आता जेतेपदासाठी अंतिम सामन्यात तिचा सामना विद्यमान जागतिक विजेती अकाने यामागुचीशी होणार आहे. यामागुचीच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून दोघी कट्टर प्रतिस्पर्धीही आहेत. आतापर्यंत दोघींमध्ये झालेल्या 29 लढतीपैकी 15 मध्ये सिंधुने तर 14 मध्ये यामागुचीने विजय मिळवलेला आहे.
























































