
दिल्लीच्या जंतरमंतर येथे बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलीस उचलून घेऊन गेले. साध्या वेशभूषेत सकाळी 7 वाजता पोलीस आले. पोलिसांनी प्रचंड गदारोळात वांगचुक यांना पडद्याआड उचलले. एका पांढऱ्या चादरीत टाकून रुग्णवाहिकेत बसवले आणि थेट सफदरजंग रुग्णालयात नेले. वांगचुक यांच्या समर्थकांनी या कारवाईला तीव्र विरोध केला. पोलिसांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात आणले म्हणजे, असे समजू नये की 20 जुलैचा मोर्चा निघणार नाही. ते मोर्चात सहभागी न होऊ शकल्यास मी नेतृत्व करेन, असा निर्धार त्यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी व्यक्त केला.
नीट पेपरफुटी, एनटीएचा भोंगळ कारभाराचा निषेध आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणामुळे त्यांचे वजन 9.5 किलोने घटले आहे. त्यांचे अंतर्गत अवयव निकामी होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळीच पोलीस साध्या वेशात उपोषणस्थळी दाखल झाले. तेथे उपस्थित असलेल्या वांगचुक समर्थकांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि सोबत आलेल्या शीघ्र कृती दलाच्या दलाच्या जवानांनी वांगचुक यांना उचलून पांढऱ्या चादरीत टाकले आणि रुग्णवाहिकेत बसवून थेट सफदरजंग रुग्णालयात नेले. यावेळी जंतरमंतर येथे प्रचंड गदारोळ झाला. वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांना जंतरमंतर येथे परत यायचे आहे, असा दावा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही वांगचुक यांना पाठिंबा दिला असून सरकारने कोणत्याही दुःखद घटनेची वाट न पाहता चर्चा करायला हवी, चर्चा करण्यात काहीच वाईट नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली.
वांगचुक यांनी सलाईन लावण्यास नकार दिला
21 दिवसांपासून अन्नाचा एकही कण न खाणाऱया वांगचुक यांची प्रकृती खालावली असून त्यांनी रुग्णालयातदेखील उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यांनी सलाईनद्वारे पोषक तत्त्व घेण्यास नकार दिला आहे. त्यांना डिहायड्रेशन झाले आहे, मात्र त्यांनी कोणतेही उपचार घेण्यास नकार दिला. ते केवळ मीठ आणि पाणी घेऊन उपोषण करत आहेत.
मनू भाकरचे वांगचुक यांना समर्थन
ऑलाम्पिक पदक विजेती खेळाडू मनू भाकर हिने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘सध्या हा आपल्या देशाचे भविष्य असलेल्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. मी एक विद्यार्थिनी आहे आणि एकावेळी आपण सर्वच विद्यार्थी होतो. प्रत्येक मुलाला शिक्षण, संरक्षण आणि समान संधीचा अधिकार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले प्राण गमावले ते आपल्या देशाचे भविष्य होते. त्यांची स्वप्नं, क्षमता आणि भविष्याचे रक्षण करायला हवे होते, असे मनू भाकर म्हणाली.
अभिजित दीपकेंवर महिलेने फेकली शाई
सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात नेल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जंतरमंतरवर आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर त्यांच्यावर एका महिलेने दीपके यांच्यावर शाई फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. दीपके हे समर्थकांना संबोधित करत होते त्यावेळी त्यांच्या एका बाजूने महिला आली आणि तिने दीपके यांच्यावर शाई फेकली. त्यानंतर तिने दीपके यांच्यासोबत वाद घातला. मात्र दीपके यांच्या समर्थकांनी तत्परता दाखवून संबंधित महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलेची चौकशी करण्यात येत आहे. तिची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकारावरून दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून निळा हा माझा रंग असल्याचे म्हटले आहे.
सरकारचा उद्दामपणा स्पष्टपणे समोर – शरद पवार
सोनम वांगचुक यांची मागणी काय होती, तर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा. का? तर धर्मेंद्र प्रधान यांनी ती जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही. त्याचे परिणाम हजारो विद्यार्थ्यांवर झाले. तरी केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. आंदोलन दिल्लीत सुरू असताना त्या ठिकाणी साधं कुणी भेटायला किंवा संवाद साधायलाही येत नाही, यावरून या सरकारचा उद्दामपणा स्पष्टपणे समोर येत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून मोदी सरकारला फटकारले. ‘सोनम वांगचुक व अन्य आंदोलकांना त्यांनी अटक जरी केली तरीदेखील हे आंदोलन चालूच राहणार. या विषयानेच संसदेला सुरुवात होईल,’ असा इशारा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
वांगचुक यांना उचलून नेणे चुकीचे – राहुल गांधी यांची टीका
सोनम वांगचुक यांना बळजबरी उचलून नेण्याबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की ‘असत्य आणि हिंसा, हेच मोदी सरकारचे मूळ सिद्धांत आहेत. शांततेने सुरू असलेल्या उपोषणादरम्यान वांगचुक यांना हटविणे चुकीचे आहे. पेपरफुटी, शिक्षणावरील वाढता खर्च, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे हिंदुस्थानच्या भविष्याशी संबंधित अतिशय गंभीर मुद्दे आहेत. ते उचलून धरणाऱयांना कोणतीही ताकद रोखू शकत नाही,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
वांगचुक यांच्या वैद्यकीय अहवालावर संशय
सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालावर संशय व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, रुग्णालयात त्यांची तपासणी केली त्यावेळी सर्व रिपॉर्ट नॉर्मल होते. आता सांगत आहेत की, त्यांच्या शरीरातील पोटॅशियमची पातळी घटून 2.9 वर आली असून त्यांच्या जिवाला धोका आहे. आम्हाला हा अहवाल दाखवण्यात आलेला नाही. आमच्या खासगी डॉक्टरांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. मला दुसरीकडे तपासणीसाठीदेखील त्यांच्या रक्ताचे नमुनेदेखील दिले जात नाहीत. अशा कारभारामुळे आम्हाला संशय येत असून त्यांना डिस्चार्ज द्यावा, जेणेकरून दुसऱ्या रुग्णालयात नेता येईल, अशी मागणी आंगमो यांनी केली.



























































