
गेल्या दीड महिन्यांपासून 48 संघांमध्ये रंगलेल्या फिफा विश्वचषकाचा प्रवास आता अखेरच्या टप्पावर पोहोचला असून रविवारी मध्यरात्री गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेनमध्ये महासंग्राम रंगणार आहे. या महासंग्रामाची क्रेझ सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातही फुटबॉल फिव्हर पाहायला मिळत असून फुटबॉलवेड्या केरळममध्ये तर अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
STORY | FIFA World Cup final: Kerala declares holiday for all educational institutions on Monday
Kerala government declared a holiday on Monday for all schools and higher educational institutions in view of the FIFA World Cup final, officials said on Sunday.
READ:… pic.twitter.com/7gcp5VTYrY
— Press Trust of India (@PTI_News) July 19, 2026
रविवारी मध्यरात्री 12.30 वाजता फिफा विश्वचषकाच्या अंतिम लढतीचा प्रारंभ होईल. विद्यमान जगज्जेता अर्जेंटिना विरुद्ध युरोपियन विजेता आणि फिफा क्रमवारीतील अव्वल स्पेन अशी ही रंगतदार अंतिम लढत म्हणजे फुटबॉलविश्वासाठी एक पर्वणी ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर केरळम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
अंतिम सामन्याचा थरार उशिरापर्यंत रंगणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींना रात्री जागून सामन्याचा आनंद घेता यावा आणि दुसऱ्या दिवशी अडचण होऊ नये म्हणून केरळममधील मुख्यमंत्री व्ही.डी. सतिशन सरकारने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. रविवारी याची घोषणा करण्यात आली. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
एक डाव जगज्जेतेपदाचा; अर्जेंटिना-स्पेन आज अंतिम फेरीत भिडणार, मेस्सीची शेवटची कीक की यमालचा उदय
मध्यरात्रीनंतर संपणाऱ्या सामन्यानंतर मुलांसाठी सकाळी शाळेत उपस्थित राहणे कठीण जाईल, असे माजी शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी म्हटले होते. विरोधी पक्ष आणि इतरांकडून विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा विचार करण्याच्या मागणीनंतर केरळम सरकारने हा निर्णय घेतला. या सुट्टीमुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना फिफा विश्वचषक फायनलच्या उशिरा रात्रीच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे सोपे जाईल, तर आधीच नियोजित असलेल्या परीक्षा मात्र सध्याच्या वेळापत्रकानुसारच सुरू राहतील.



























































