
तरुणाईचा अणुबॉम्ब तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. त्यामुळे आता केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नको, तर हे सरकारच बदलण्याचा लढा आता सुरू झाला पाहिजे, असा घणाघाती इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दादर येथील शिवतीर्थावर आंदोलन केले. यावेळी जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली.
भाषणाची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आता एक पोस्टर होतं, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’, ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. जे सरकार आपल्याला रोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही; ते सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. आम्हाला आता धर्मेंद्र प्रधान नको, हे सरकार नको. मी नेतृत्व करायला आलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हावं, हे सांगण्यासाठी आलो आहे. फक्त मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे की, आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, ती हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार? ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये. या आगीमध्ये हे सरकार जळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे. हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाही. या सरकारने केवळ चंदा चोरी, व्होट चोरी नाही केली, त्यांनी तुमचं भविष्य चोरलं, या देशाचं भवितव्य चोरलं. काय दिलं या सरकारने तुम्हाला? आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतरमंतरच्या इकडे जणू काही युद्धाची तयारी सुरू झाली आहे. सैन्य आणतायत, फौज आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये, या देशामधल्या तरुणाईचा जो अणुबॉम्ब आहे, हा तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. ही आता जी युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का परीक्षेच्या वेळेला नीट केली असती, तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “मी काय म्हणतो, एकदा होऊन जाऊ द्या; सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलं आहे आणि या दळभद्री सरकारने या देशाला काय दिलेलं आहे. जे आपले सैनिक आहेत, ते तुमच्यासारखेच आहेत. तुम्ही तरुणाई, या देशाचे भविष्य आहात. देशाचे रक्षणकर्ते तुमच्यासारखेच तरुण सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेंपरेचर… आपल्याकडे मुंबईमध्ये २०-२२ अंश तापमान झालं की, थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फात सैनिक उभे राहतात, आपल्यासाठी. ते तिकडं आहेत, म्हणून आपण इकडे आहोत. ज्याने या सैनिकांसाठी सोलर टेंट बनवले… या सैनिकांनी देशासाठी मरण्याची तयारी ठेवली, म्हणजे मेलो तरी बेहत्तर, पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले; तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. तिथल्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन, ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोणाचं आहे, कुठे आहे? हे यांचं देशप्रेम नाही. हे अदानींचे सगळे प्रेमी, हे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो, मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. बघा गंमत कशी आहे की, याच संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिलं. त्यांचे दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, पाकिस्तानबरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तानबरोबर? जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. मोहन भागवत यांना विचारलं तर, मोहन भागवत म्हणतात की, होय बरोबर आहे. हम हिटलर जैसे नही है. अहो भागवत साहेब, हे ‘हम हिटलर जैसे नही है’ तुमच्या मोदींना सांगा! आणि पाकिस्तानबरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक यांच्याबरोबर का नाही करत? जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय, त्याच्याबरोबर चर्चा; आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलर टेंट बनवतोय, त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या ना या देशासाठी! अशी माणसं परत परत होत नाहीत.”
ते म्हणाले की, “आज सगळे तिकडे पोलीस फौजफाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये, का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नवजवान तरुणांविरुद्ध तुम्ही देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती झालेले तरुण वापरणार? मग तरुणांनाच तरुणांच्या विरुद्ध उभं करणार? आणि तुम्ही काय तिकडे जिलेब्या पाडत बसणार का, ढोकळा खात बसणार? आता काही जण मला विचारतात, ‘मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है, आप जाओ उधर मेलोडी ले लो, खुद जान जाओ. जो भी जानना है, जान लो, समझ जाओ.’ मग तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या? म्हणून मी म्हटलं ना, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी-जानव्याचं हिंदुत्व मानणारे आम्ही हिंदू नाही आहोत. आम्ही देशभक्त हिंदू आहोत. म्हणून मी काल मोहन भागवतांना जे विचारलं की, आज जे काय देशात चालू आहे, हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्त्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती-धर्माचा असू दे. जो या देशावरती प्रेम करतो, तो आमचा आहे. पण गंमत आणखीन कशी असते, ती बघा. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यातून भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्हीसुद्धा होतो, अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती! जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्या वेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं. अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक म्हटलं नव्हतं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने चौथ्या-पाचव्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता. विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी-बिदरी आणून… अरे काय अतिरेक्याला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजेत? मोदी सरकारला सांगतो की, तुम्ही चादरीने वांगचुक यांना जरी झाकलं असेल तरी, तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. तुमच्या पापावर तुम्ही पांघरूण अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. कितीही झाका तुमचा पापाचा घडा भरणारच आहे. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच चौथ्या-पाचव्या दिवशी दूध पाठवलं होतं, तसं का नाही पाठवलं मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते, हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं, हेच जर माहिती नाही, तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं, या यातना यांना कळणार कशा? आता डिग्री खरी की खोटी हासुद्धा प्रश्न आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही जर का बघाल तर, तरुण मुलं-मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय, त्यांचे आजी-आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई-वडील आलेले आहेत. याचं कारण असं की, मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे. माझ्या मुलींनी शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी घोषणा आहे, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’. अरे, पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला, तर ती मुलगी आत्महत्या नाही करणार? मुलगा आत्महत्या नाही करणार? मग एवढ्या मुलांनी आत्महत्या केल्या तरी, एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? बरं, अण्णा हजारेंचा एक विषय झालाच, पण या घराणेशाहीबद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचुक उपोषणाला बसलेत तिकडे. पण सोनम वांगचुक यांचे वडील, त्यांनीसुद्धा उपोषण केलं होतं. माहिती आहे तुम्हाला, किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकूमशहा असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचुक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या. तरी हे तिकडे दिल्लीत राहून, दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाहीवादी आणि इंदिरा गांधी हुकूमशहा? एक मिनिट, हा ‘गली गली में शोर है’, बरोबर आहे. पण तुम्ही कुठल्याही गल्लीतून आला असाल, कुठल्याही गावातून आला असाल, त्या गल्लीगल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल. तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते, त्यांना मी हेच सांगतोय की, तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन. पण मी एकटा गेलो असतो तर, फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे. आणि हे आंदोलन आता फक्त जंतरमंतरपुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जायचं आहे. आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत. इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं आहे की, आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की, साधी महिला ही झुरळाला घाबरते. घाबरता ना? अरे इकडे आमचा पंतप्रधान घाबरतो! अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष, ज्यांनी भाड्यानी माणसं घेतलेली आहेत, भाड्यानी म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना, असा पक्ष झुरळाला घाबरतो? आता कळलं मला की, हा पक्ष झुरळाला का घाबरतो? हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाहीयेत. सगळी भाडखाऊ आहेत, चोरून आणलेली, गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल, माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे की, तुम्हाला ‘वन नेशन वन इलेक्शन’ घ्यायचं आहे ना, आत्ता जाहीर करा, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत.”
मोदी सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं? या राष्ट्राची ताकद, या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं? तुम्ही या माझ्या तरुणांना जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता, पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसले आहात. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर, त्यांची बुडं टेकायला या गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होतं त्यांचं? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग किती किती नावं घ्यायची? चापेकर बंधू सगळे याच वयातले होते, ज्यांना आज आपण जेन झी म्हणतो. ती काय झुरळं होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय? जर स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता, तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं, तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो आहोत की नाही? ते टिकवणं आपलं काम आहे की नाही? आपलं कर्तव्य आहे की नाही? जे आपल्याला झुरळ म्हणतायेत… मी सुद्धा झुरळ आहे. कोणी एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल, तर झुरळांचे आई-वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की, जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपले न्याय हक्क नाकारतो आहे… या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. मी आज त्या सत्तेला चिकटलेल्यांना गोचिडी म्हणतोय. जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पीत आहेत. या सत्तेला चिकटलेल्या, लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. आजपासून हा लढा सुरू होतोय.”
ते पुढे म्हणाले की, “तिकडे जंतरमंतरला काय करतील सांगता येत नाही, कारण सगळी सैन्याची जमवाजमव सुरू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा असंच १००-१५० वर्षे राज्य केलं होतं. पण देशातली जनता जेव्हा एकजुटीने रस्त्यावरती उतरली, तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून पाय काढून पळावं लागलं होतं. तसंच यांचं आपल्याला करावं लागेल. आजपासून तुम्ही जिथे जिथे असाल, मी या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं झेपेल, तसं हे स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध आता सुरू करा. करा, जिथे सभा घ्यायच्यात सभा घ्या. जिथे मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा, तिथे मेणबत्त्यांचा मोर्चा, जिथे मशाल मोर्चा काढायला जमेल, तिथे मशाल मोर्चा काढा. मानवी साखळी तर, मानवी साखळी करा. पण जिथे जाल तिकडे सगळ्यांना कळलं पाहिजे की, ‘अब देश इन लोगों की बात मानने वाला नही है’. नवीन आणखीन एक तुम्हाला सांगतोय, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर? ‘मै अण्णा हूं’, आता तुम्ही करायचं, मैं देशभक्त हूँ. मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त आहे, तो माझ्या भारत मातेचा आहे. मी मोदींचा अंधभक्त होऊ शकत नाही, कदापि नाही. आजपासून सुरू करा, ‘मी देशभक्त’. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्यासमोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आजसुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो. संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवून द्या. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. मी म्हणतो ही ठिणगी आहे. पण एक ठिणगी वणवा पेटवायला पुरेशी असते. ती ठिणगी आज पडलेली आहे. आणि देशाच्या लुटारूंना सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही शपथ घेऊन आपण या आंदोलनाला सुरुवात करूया.”
































































