
अमेरिका -इराण वाढता संघर्ष आणि जागतिक अशांतता याचा परिणाम शेअर बाजारासह सोन्याचांदीच्या दरावरही होत आहे. या युद्धामुळे सोने त्याच्या उच्चांकापासून स्वस्त मिळत आहे. तसेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोन्यात आणखी घसरण होणार की त्याचे दर वधारणार, याबाबत अनेक तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. काहीजणांच्या मते इतिहासाची पुनरावृत्ती होणार असून 1980 प्रमाणे उच्चांकापासून सोन्याच्या दरात 50 टक्के घसरण होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध तीव्र होत आहे. त्यामुळे सध्या सोन्याच्या किमती दबावाखाली आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये, सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १.९१ लाख या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती. आता सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोन्याच्या किमतीत ५०% घसरण होण्यामागे तज्ज्ञ १९८० आणि २०१२-१३ या वर्षांचा उल्लेख करत आहेत. जानेवारी २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस $५,५९५ चा नवा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यानंतर आता त्यात घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.
जानेवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत २५% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. सध्या, २४-कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत सुमारे ₹१.४१ लाख आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञ सोन्याबद्दल आशावादी नाहीत. काही जण मोठ्या घसरणीचा अंदाज वर्तवत आहेत. परिणामी, गुंतवणूकदार सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबद्दल अनिश्चित आहेत.
कॉइनकोडेक्ससारख्या काही टेक-इंडिकेटर्सनी असा अंदाज वर्तवला आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती या वर्षाच्या अखेरीस $२,७८० पर्यंत घसरू शकतात, म्हणजेच जानेवारीतील उच्चांकापेक्षा सुमारे ५०% नी खाली येऊ शकतात. मात्र, आघाडीचे तज्ज्ञ, विशेषतः गोल्डमन सॅक्स आणि जे.पी. मॉर्गन, यांच्या मते सोने $3,800 ते $4,000 च्या मजबूत सपोर्ट झोनच्या आसपास स्थिर राहील आणि पूर्णपणे कोसळणार नाही असे मत व्यक्त केले आहे.
सोन्याच्या दरात ५०% घसरण होण्यामागे १९८० चे दशक आणि २०१२-१३ ही वर्षे कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. तथापि, ऐतिहासिकदृष्ट्या, सोन्याची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर केवळ एकदाच ५०% किंवा त्याहून अधिक घसरली आहे. मात्र, अनेक वेळा किमती २०% ते ३०% नी घसरल्या आहेत.
जानेवारी १९८० मध्ये, इराण संकट आणि सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणामुळे जागतिक चलनवाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती प्रति औंस ८५० डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. त्यानंतर लगेचच, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदर आक्रमकपणे जवळपास २०% पर्यंत वाढवले आणि सोन्याची चमक फिकी पडू लागली. १९८२-१९८५ पर्यंत, सोन्याची किंमत प्रति औंस ३०० ते ३५० डॉलरपर्यंत घसरली होती. ही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून ६०% पेक्षा जास्त घसरण होती, ज्यामुळे किंमती निम्म्याहून कमी झाल्या.
२००८ च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. सप्टेंबर २०११ मध्ये, सोन्याने प्रति औंस १,९२० डॉलरचा तत्कालीन विक्रमी उच्चांक गाठला. मंदीनंतर अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्था सावरू लागल्याने, गुंतवणूकदारांनी सोन्यातून शेअर बाजारात पैसे वळवण्यास सुरुवात केली. डिसेंबर २०१५ पर्यंत, सोन्याची किंमत प्रति औंस १,०५० डॉलरच्या नीचांकी पातळीवर घसरली होती, जी त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून जवळपास ४५% ची घसरण होती.
सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, जानेवारी २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति औंस ५,५९५ डॉलर्सचा नवा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. परंतु मध्य-पूर्वेतील तणाव, वाढत्या जागतिक महागाईचा धोका आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याची भीती, यांमुळे सोन्याची किंमत उच्चांकी पातळीवरून जवळपास ३०% घसरून ४,००० डॉलर्सच्या खाली आली आहे आणि येथून पुढे आणखी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
तांत्रिक विश्लेषकांच्या मते, गेल्या दोन वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ प्रमाणाबाहेर होती. बाजाराचा एक नियम आहे की, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत तिच्या मूळ मूल्यापेक्षा लक्षणीयरीत्या वाढते, तेव्हा ती तिच्या ऐतिहासिक सरासरी पातळीवर परत येते. त्यामुळे अनेक तज्ज्ञ सोन्याच्या दरात घसरणीचा अंदाज वर्तवत आहेत.






























































