हिंदुस्थानी महिलेचा मस्कतमध्ये अमानुष छळ; भावुक व्हिडिओमधून मांडली व्यथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदेशात कामानिमित्त गेलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप ‘जैसे थे’ आहे. ओमानमधील मस्कत येथे घरकामगार म्हणून काम करण्यासाठी गेलेल्या हैदराबादच्या महिलेचा तेथे अमानुष छळ करण्यात आला. तिला तीन महिन्यांपासून दिवस-रात्र राबवून घेण्याबरोबरच मारहाणही करण्यात आली. हा छळ असह्य झाल्यानंतर हिंदुस्थानातील लोकप्रतिनिधीला एक भावुक व्हिडिओ पाठवून तिची व्यथा मांडली आहे. तिला सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी व्यवस्था करण्याची विनंती तिच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केली आहे.

तेलंगणामधील हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या शबनम बेगम या महिलेने लोकप्रतिनिधीला स्वतःचा व्हिडिओ पाठवला आहे. स्थानिक भरती एजंटने घरकामगार म्हणून नोकरीचे आश्वासन दिल्यानंतर ती 26 मार्चला ओमानला गेली होती. तेथे गेल्यानंतर पहिल्या दिवसापासून ती वाईट अनुभव घेत होती. तिला तीन महिन्यांहून अधिक काळ कोणताही पगार न देता दिवस-रात्र राबवून घेण्यात आले. दररोज 15 तास काम करण्यास भाग पाडले गेले. दीड महिना कोणाशीही संपर्क न ठेवण्याच्या हेतूने मोबाईल फोनही दिला नाही, असा आरोप शबनम बेगम हिने केला आहे.

26 वर्षीय शबनमने हैदराबादमधील ‘मजलिस बचाव तहरीक’चे नेते अमजद उल्ला खान यांना भावूक व्हिडिओ पाठवला आहे. मस्कतमध्ये तिचा अमानुष छळ करण्यात आला आणि मारहाणही करण्यात आला. तसेच योग्यरित्या जेवण दिले जात नसल्याचे शबनमने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तिथला छळ सहन न झाल्यामुळे आपण मालकाच्या तावडीतून पळून मस्कत येथील हिंदुस्थानी दूतावासात पोहोचल्याचा दावा तिने केला आहे. एजंट्सनी तिचा पासपोर्ट काढून घेतल्याचा आरोप शबनमने केला. याचवेळी तिने अमजद उल्ला यांना आपली सुटका करण्याची विनंती केली आहे, तर तिच्या कुटुंबियांनी तिला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी व्यवस्था करण्याचे साकडे परराष्ट्र मंत्र्यांना घातले आहे.

अमजद उल्ला यांच्या म्हणण्यानुसार, 200 ओमानी रियाल (सुमारे 50,000 रुपये) मासिक पगाराचे आमिष दाखवून तिला घरकामगार म्हणून काम करण्यासाठी मस्कतला नेण्यात आले होते. ओमानला पोहोचल्यानंतर तिला दररोज 12 ते 15 तास वेगवेगळ्या घरांमध्ये काम करण्यास भाग पाडले गेले. तसेच योग्य अन्न आणि राहण्याची सोय नाकारली गेली. चार महिने कोणताही पगार दिला गेला नाही,” असे उल्ला यांनी ‘एक्स’वर नमूद केले आणि शबनमने व्हिडिओद्वारे केलेले आवाहन पोस्ट केले.