Yavatmal News – लिव्ह-इन नात्याचा रक्तरंजित शेवट; प्रेयसीची हत्या करून प्रियकराने जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक विवंचना, व्यवसायातील अपयश आणि नात्यात आलेल्या दुराव्याचा दुर्दैवी शेवट नाशिकमध्ये झाला. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील एका तरुणाने विभक्त झालेल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून परिसरातही खळबळ उडाली आहे. साहील अशोक लाव्हारे (25) आणि वैष्णवी आवारे (20) अशी दोघांची नावे आहेत.

सुमारे तीन वर्षांपूर्वी पुण्यात नोकरीदरम्यान साहील आणि वैष्णवी यांची ओळख झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी पुणे सोडून उमरखेडमध्ये भाड्याच्या घरात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहण्यास सुरुवात केली. संसार उभा करण्याच्या उद्देशाने साहीलने एप्रिल महिन्यात उमरखेडमधील ‘पाटीलवाडा’ नावाचे हॉटेल भाडेतत्त्वावर सुरू केले.

मात्र, हॉटेल व्यवसायात अपेक्षित यश न मिळाल्याने साहील आर्थिक अडचणीत सापडला. वाढत्या कर्जामुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. अखेर वैष्णवीने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेत उमरखेड सोडले आणि नाशिकला गेली. या घटनेनंतर साहील नैराश्यात गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

चार दिवसांपूर्वी साहील नाशिकला गेला. इंदिरानगर परिसरात त्याने वैष्णवीची भेट घेत पुन्हा एकत्र येण्याची विनंती केली. मात्र, वैष्णवीने नकार देत आपले दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याचे सांगितले. या घटनेनंतर संतापलेल्या साहीलने जवळील चाकूने तिच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर साहीलने जवळील जॉगिंग ट्रॅक परिसरात जाऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

वैष्णवीच्या आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. तिचा सांभाळ आजी-आजोबांनी केला होता. प्रतिकूल परिस्थितीत तिने आयुष्य उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुष्यात नवा मार्ग निवडण्याचा तिचा निर्णय अखेर तिच्यासाठी जीवघेणा ठरला. या प्रकरणी वैष्णवीचा होणारा पती गोपाळ वैरागी यांच्या तक्रारीवरून नाशिक पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.