CJP Delhi Protest – संसदेत गदारोळ, कामकाज ठप्प; मोदींचा मागच्या दाराने पळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी ‘नीट पेपरफुटी, जंतर-मंतरवरील तरुणांचे आंदोलन, राम मंदिरातील देणगी चोरी यासारख्या मुद्द्यांवरून सरकारची कोंडी केली. कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चावर झालेल्या लाठीमारादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यावरून झालेल्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.

अधिवेशन सुरू होताच संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी लोकसभेत श्रद्धांजली वाहत असतानाच विरोधी पक्षांमधील काही सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभा तहकूब केली. विरोधक नीट परीक्षेतील गोंधळ, राम मंदिरातील देणगी चोरी या मुद्दय़ांवर चर्चेची मागणी करत होते. त्यानंतर 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतरदेखील विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यामुळे सहा वेळा लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर दुपारी 3 वाजता लोकसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. याच गदारोळात कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सरन्यायाधीशांसह 34 वरून 38 करण्याचे विधेयक मांडले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करत असल्याचा  आरोप करत ते म्हणाले, पेपरफुटी आणि नीट परीक्षा घोटाळय़ाचा हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित एक अत्यंत गंभीर विषय आहे. लाखो मुलांचे भविष्य धोक्यात आहे. या मुद्दय़ाच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी जंतरमंतरवर जमले होते तिथे लाठीचार्ज झाला. आवाज दाबण्यासाठी आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकार बळाचा वापर करत आहे. खरगेंचा मुद्दा संपताच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. याच गदारोळात राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

चर्चेऐवजी विद्यार्थ्यांवर लाठीमार – प्रियंका गांधींची टीका

काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनीही लाठीमारानंतर मोदी सरकारवर टीका केली. संसदेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, शिक्षणाच्या विषयावर आम्ही संसदेत चर्चेची मागणी करत आहोत. शिक्षण धोरणात गंभीर समस्या आहेत. मात्र, सरकार चर्चा करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचे नळकांडे फोडत आहे, त्यांना मारहाण करत आहे. का? ती आपलीच मुले आहेत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

राज्यसभेतही लाठीमाराचा निषेध करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यामुळे राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.

मोदींचा मागच्या दाराने पळ

सभागृहात येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेबाहेर भाषण ठोकले. सभागृहांचे कामकाज सुरू झाले तेव्हा जेन-झींचा मोर्चा संसदेपासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर येऊन धडकला होता. पोलिसांनी लाठीमार केल्याने मोर्चा चिघळत चालला होता. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कडेकोट सुरक्षेत संसदेच्या मागच्या दाराने काढता पाय घेतला.

मोदी हे इतिहासातील तरुणविरोधी पंतप्रधान

मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरुणविरोधी पंतप्रधान आहेत, ते एक अयशस्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकत नाहीत. 152 प्रश्नपत्रिका फुटल्या, 7.5 कोटी विद्यार्थी त्रस्त आहेत. पण एकाही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही. शिक्षा कोणाला? तर मेहनती तरुणांना. जेव्हा या तरुणांनी शिक्षणाबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्यावर लाठीचार्ज केला. प्रश्नपत्रिका फोडणारे मोकळे फिरत आहेत, असा संताप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला.