31 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; तिघांना अटक, तोफखाना पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (दि. 19) रात्री शहरातील मिस्कीन मळा, तारकपूर परिसरात धडक कारवाई करून 31 लाख 4 हजार रुपये किमतीचे 150 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज पकडले. या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, दोनजण पळून जाण्यात यशस्वी झाले.

 

जिशान शौकत सय्यद (वय 26, रा. मुकुंदनगर, सहारा कॉलनी), रिहान जावेद शेख (वय 26, रा. छोटी मरियम मशिदजवळ, मुकुंदनगर), वसीम खलील बागवान (वय 38, रा. पिंजार गल्ली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत, तर जमीर निसार शेख व एक अनोळखी फरार झाला.

 

मिस्कीन मळा, तारकपूर परिसरात तोफखाना पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, विना क्रमांकाच्या कारमध्ये पाचजण संशयितरीत्या फिरताना दिसले. त्यातील दोनजण पळून गेले. उर्वरित तिघांना पाठलाग करून तोफखाना पोलीस ठाण्यासमोरील रोडवर थांबविले. गाडीची झडती घेतली असता, प्लॅस्टिक पिशवी व डबीमध्ये 31 लाख 4 हजार रुपयांचे 150 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज, स्प्रे, लाईटरगन, इंजेक्शन सीरिज, रबरी मुखवटे, मास्क, हॅण्डग्लोव्हज्, गाडीच्या नंबर प्लेटा, चाकू असा मुद्देमाल मिळून आला. कॉन्स्टेबल सतीश त्रिभूवन यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

 

पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश चाहेर, परशुराम दळवी, नितीन उगलमुगले, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, अब्दुलकादर इनामदार, सुमीत गवळी, सतीश त्रिभूवन, सुजय हिवाळे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भापसे, सतीश शिंदे, कपिल गायकवाड, जिजा खुडे, कल्पना अवसरे, शुभम खुडे, दीपक जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.