
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (बाईंगवाडी) येथे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेचा कारभार कागदावरच उरल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात ग्रामस्थांच्या घरोघरी पाण्याचा एक थेंबही आलेला नसताना, योजना पूर्ण दाखवून तब्बल ४० लाखांचे बिल लाटण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
‘माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ’ संगमेश्वर तालुक्याचे सक्रिय सदस्य निलेश अशोक सावंत यांनी केलेल्या कायदेशीर पाठपुराव्यामुळे या महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.निलेश सावंत यांच्या निवेदनाची दखल घेत कोंडगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच सौ.धनश्री राजेंद्र जोशी यांनी ग्रामस्थ व सदस्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणीत समोर आलेला बोगस कारभार स्पष्ट करणारा अधिकृत ‘स्थळ पाहणी अहवाल’ ग्रामस्थांच्या सामूहिक स्वाक्षऱ्यांसह थेट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.यामुळे भ्रष्ट ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
शासकीय दप्तरी ही योजना २७ जानेवारी २०२४ रोजीच पूर्ण दाखवून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली असून, ठेकेदाराला ४०,२१,८९४ रुपयांचे अंतिम बिल देखील अदा करण्यात आले आहे.मात्र प्रत्यक्षात केलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कागदावर ८१ नळ जोडण्या दाखवून निधी लाटण्यात आला, परंतु जागेवर केवळ ५२ नळ जोडण्या आढळल्या असून उर्वरित २९ जोडण्या केवळ कागदावरच आहेत. विशेष म्हणजे, योजना पूर्ण घोषित झाल्यापासून आजतागायत एकाही ग्रामस्थाच्या घरात पाण्याचा एक थेंबही आलेला नाही.
पाण्याच्या मुख्य टाकीची पाहणी केली असता त्यात तब्बल दोन वर्षांपूर्वीचे साचलेले व सडलेले पाणी आढळून आले आहे.या योजनेच्या पंप शेडला अद्याप वीज मीटरच बसवलेले नाही, त्यामुळे वीज कनेक्शन नसताना योजना पूर्ण कशी दाखवली, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. तसेच, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून दिलेली नळ कनेक्शन जागोजागी तुटलेली आहेत आणि मुख्य पाईपलाईन जमिनीखाली गाडण्याऐवजी उघड्यावरच सोडून देण्यात आली आहे.
जनतेच्या कराच्या पैशांची अशी लूट करणाऱ्या भ्रष्ट ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, तसेच खोटी माहिती देऊन दप्तर गायब करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी तीव्र मागणी निलेश सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आणि कोंडगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.


























































