मुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी, अमरनाथ यात्रा गेल्या 4 दिवसांपासून स्थगित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मिर आणि उत्तराखंडमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे अचानक येणारे पूर, ढगफुटी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वैष्णो देवी मंदिर, अमरनाथ यात्रा आणि चारधाम यात्रेवर परिणाम झाला आहे. जम्मूतील वैष्णो देवी यात्रा आणि काश्मीरमधील अमरनाथ यात्रा मुसळधार पाऊस, अचानक आलेला पूर आणि ढगफुटीमुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच सलग चौथ्या दिवशी या दोन्ही यात्रा स्थगित झाल्या आहेत.

जम्मू आणि कश्मिरमध्ये मुसळधार पावसामुळे सोमवारी वैष्णो देवीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या अर्धकुमारी भवनकडे जाणाऱ्या नवीन मार्गावर मोठे भूस्खलन झाले. यामुळे, या मार्गावरील यात्रेकरूंची वाहतूक आणि बॅटरी कार सेवा स्थगित करण्यात आली. वैष्णो देवीच्या भाविकांना नेहमीच्या मार्गाने जाण्यास सांगण्यात आले आहे. तेथील शाळाही 26 जुलैपर्यंत बंद आहेत. माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्र मंडळाचे कर्मचारी आणि मदत पथकांनी ढिगारे हटवण्याचे काम तीव्र केले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जम्मू आणि कश्मिरच्या बहुतांश भागांमध्ये नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे डोडा, पूंछ आणि राजौरी येथे तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे. जनतेला आणि भाविकांना सतर्क राहण्याचा आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.