
दिल्लीत जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न झाला. याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा देत सरकारला धारेवर धरलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर एक खरमरीत पोस्ट करत सरकारला लक्ष्यं केले आहे. ‘सरकारने सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं, आंदोलकांवर बेफाम लाठीचार्ज केला, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय’, अशा शब्दात केंद्रातील मोदी सरकारवर टीक केली. तसेच पंतप्रधान मोदींना लक्ष्य करताना, ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा, असा टोला लगावला आहे.
आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणातात, ‘केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय’.
‘आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे’, असं लिहित त्यांनी मोदींना लक्ष्य केलं.
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले?
‘मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे?’ असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा भाजपने कसा बचाव केला होता याची आठवण या पोस्टमधून करून दिली आहे. तसेच सत्ताधारी, हे विरोधक, जनता यांच्या आंदोलनांना गांभीर्याने का घेत नाही याचे कारण सांगताना मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘सत्ताधाऱ्यांना कुणी काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं’, अशा शब्दात सणसणीत टोला लगावला आहे.
विद्यार्थ्यांशी चर्चा करा
आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे’, असेही राज ठाकरे म्हणाले.





























































