
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अति दुर्मिळ आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या रेड लिस्टमध्ये ‘अति धोकाग्रस्त’ या कॅटेगरीत असलेली ‘अपोनोजेटॉन नटेशी’ नावाची एक पाणवनस्पती आढळते. या वनस्पतीचे साताऱ्यात आढळणाऱ्या ‘वाय’ तुऱ्याशी जरी साधर्म्य आढळत असले, तरी श्रीरंग यादव आणि अरुण चांदोरे यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे ही प्रजाती पूर्णपणे वेगळी असल्याचे नेत्रा आपटे यांनी सांगितले. देवरुख येथील निसर्ग अभ्यासक प्रतीक मोरे यांना प्रथम राजापूर येथे हंस तुरा ही वनस्पती आढळून आली.
केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी सल्लागार डॉ. एस. नटेश यांच्या नावावरून या वनस्पतीला ‘अपोनोजेटॉन नटेशी’ हे नाव दिले गेले. महाराष्ट्रात फक्त राजापूर पट्ट्यात ही प्रजाती अतिशय थोड्या जागेपुरती मर्यादित आहे. देशात फक्त तीन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात याचा आढळ आहे आणि ते ही अत्यंत थोड्या प्रमाणात. अत्यंत प्रदेशनिष्ठ असल्याने, जर का या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही, तर ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
ही प्रजाती दोन ते अडीच मीटर खोल पाण्यातच वाढते. पाण्याखाली याचा कांदा वाढतो, पानेही पाण्यातच असतात. देठ दोन एक मीटर वाढून पाण्याच्या वर याचा तुरा येतो, तो हंस पक्ष्याच्या चोचीसरखा दिसतो. त्यामुळे त्याला हंस तुरा म्हटले तरी चालण्यासारखे आहे. या तुऱ्यावर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात छोटी छोटी फुले येतात आणि मग फळे धरतात. मात्र या वनस्पतीचे परागीभवन कसे होते याविषयी अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही. सध्या हे तुरे, वापरून सोडून दिलेल्या खोल चिरेखणीत साठलेल्या पाण्यात वाढलेले आहेत.
पावसाळा संपल्यावर त्यातील पाणी आटल्यावर जर का त्या खणीच्या मालकांनी पुन्हा ती चिरेखण वापरात आणायचा निर्णय घेतला, तर तिथून ही वनस्पती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका संभवतो. तसेही कातळ सड्यांवर चाललेल्या भरमसाठ बांधकामांमुळे इतर प्रजातींवर त्या, त्या प्रदेशातून नष्ट होण्याचे संकट उद्भवलेले आहे. मात्र या हंस तुऱ्याइतक्या दुर्मिळ प्रजातीवर असे संकट येऊ नये, म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील असे नेत्रा आपटे – पालकर यांनी नमूद केले. आपला रत्नागिरी जिल्हा हा जैवविविधतेच्या बाबतीत अत्यंत समृद्ध असा जिल्हा आहे. हे वैविध्य टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.
जेव्हापासून निसर्ग अभ्यासक नेत्रा पालकर आपटे यांनी छायाचित्रण करायला सुरूवात केली, त्यानंतर कळत नकळत त्यांच्या कॅमेऱ्यातून कोकणातील जैवविविधतेचे छायाचित्रण होत गेले. कधी पक्षी, कधी प्राणी, कधी फुलपाखरं तर कधी विविध फुलं. हळूहळू कुतूहलाची जागा जाणिवेने घेतली आणि मग दरवर्षी ठरवून अतिशय प्रदेशनिष्ठ असलेल्या प्रजातींचे फोटो काढणं सुरू केलं. यातून कोकण, कोकणातील जैवविविधता आणि कातळसडे याविषयी अधिक माहिती मिळत गेली आणि अजूनही त्यांना अशी माहिती मिळते आहे.





























































