‘सैयारा’च्या रॉयल्टीवरून तनिष्क बागची आणि यशराजमध्ये उडाले खटके… अद्याप 8 लाख मिळाले नसल्याचा संगीतकाराचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सैयारा हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष उलटले. आजही या चित्रपटातील गाणी तरूणांच्या गळ्यातील ताईत आहे. याच चित्रपटातील लोकप्रिय टायटल ट्रॅकच्या रॉयल्टीवरून संगीतकार तनिष्क बागची आणि यशराज फिल्म्स (YRF) यांच्यातील वाद आता उफाळून आला आहे. तनिष्क यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत गाण्यासाठी मिळणाऱ्या रॉयल्टीपैकी 8 लाख रुपये अद्याप मिळाले नसल्याचा दावा केला. ही पोस्ट नंतर हटवण्यात आली असली, तरी तिची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

 

तनिष्क यांनी पोस्टमध्ये सांगितले की, ‘सैयारा’ हा YRF सोबतचा त्यांचा पहिला चित्रपट होता. या गाण्याच्या निर्मितीपासून ध्वनिमुद्रण, संगीत संयोजन, मिक्सिंग आणि व्होकल ट्युनिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मनापासून मेहनत घेतली. मात्र, निर्मितीसाठी मिळालेली मानधनाची रक्कम बहुतांश तांत्रिक कामांवर खर्च झाली आणि स्वतःकडे जवळपास काहीच उरले नाही, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय, रॉयल्टी स्टेटमेंटनुसार विविध प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी स्ट्रीम्स आणि व्ह्यूज मिळूनही केवळ 8 लाख रुपयांची रॉयल्टी मिळणे अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे त्यांनी म्हटले. ही रक्कमही अद्याप मिळालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

 

“मी ही पोस्ट सहानुभूती मिळवण्यासाठी लिहित नाही. संगीत तयार करण्यासाठी कलाकार किती मेहनत घेतात आणि त्यांच्या योगदानाला योग्य सन्मान मिळायला हवा, हे सांगण्यासाठी मी हे लिहित आहे,” असेही तनिष्क यांनी स्पष्ट केले. या अनुभवामुळे इंडस्ट्रीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्याचे सांगत, यापुढे सर्जनशीलतेचा आदर करणाऱ्या निर्माते-दिग्दर्शकांसोबतच काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

दरम्यान, तनिष्क यांच्या आरोपांनंतर YRF ने अधिकृत निवेदन जारी करून सर्व आरोप फेटाळले. स्टुडिओने म्हटले की, ‘सैयारा’चे टायटल ट्रॅक हे तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निझामी या तिघांचे संयुक्त काम असून, करारानुसार रॉयल्टी तिघांमध्ये समान वाटली गेली आहे आणि पुढेही त्याच पद्धतीने वाटली जाईल.

 

YRF ने पुढे स्पष्ट केले की, “सर्व सहकलाकारांना करारात नमूद केलेल्या अटी आणि वेळापत्रकानुसार त्यांचे सर्व देय पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही थकबाकी नाही.”

 

मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटातून अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाप्रमाणेच त्यातील संगीतालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, विशेषतः टायटल ट्रॅकने लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.