
स्पेनने गताविजेत्या अर्जेंटिनाचा पराभव करीत यंदाच्या फिफा वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. मात्र, पराभवानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या राड्यावर इंग्लंडच्या वेन रुनासारख्या दिग्गज खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे.
सामन्याच्या अखेरीस अर्जेंटिनाचा मिडफिल्डर एन्झो फर्नांडेझला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर अंतिम शिट्टीनंतर लिएंड्रो पारेडेस आणि नाहुएल मोलिना यांच्या वर्तनामुळे मैदानावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्पेनच्या खेळाडूचा थेट गळा पकडेपर्यंत अर्जेंटिनाच्या खेळाडूची मजल गेल्याचे सर्वांनी पाहिले.
उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या विजयावेळीही अर्जेंटिनाच्या आक्रमक वर्तनावर टीका झाली होती. त्याच मुद्दय़ावर वेन रुनी म्हणाला, ‘अर्जेंटिनाकडून असे वर्तन नवीन नाही. पराभव स्वीकारताना संयम आणि मोठेपणा दाखवायला हवा होता. हे अत्यंत निराशाजनक आहे.अंतिम शिट्टीनंतर अर्जेंटिनाचा बचावपटू नाहुएल मोलिनाने स्पेनचा मिडफिल्डर रोड्रीवर धाव घेत त्याला धक्का दिल्याने वाद अधिकच वाढला. फुटबॉलमध्ये ते प्रत्येक बाबतीत मागे पडले. खेळात मात झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचे वर्तन केले हे अत्यंत चुकीचे आहे.’
मेस्सी मिसिंग…
आठ वेळा बॅलन डी’ऑर जिंकणाऱ्या 39 वर्षीय मेस्सीने स्पर्धेत आठ गोल आणि चार असिस्टची नोंद केली. मात्र अंतिम सामन्यात स्पेनच्या भक्कम बचावासमोर त्याला प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे 2021 आणि 2024 कोपा अमेरिका तसेच 2022 विश्वचषक जिंकल्यानंतर सलग चौथ्या मोठ्या जेतेपदाचे अर्जेंटिनाचे स्वप्न भंगले. अंतिम शिट्टी वाजताच स्पेनच्या खेळाडूंनी जल्लोष केला, तर अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू होते. मेस्सी काही काळ मैदानावरच बसून आजूबाजूचे दृश्य पाहत राहिला. हा त्याचा अर्जेंटिनाकडून खेळलेला अखेरचा विश्वचषक ठरला.





























































