
आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलीस अत्याचारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध स्तरांतून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आपल्यावर झालेल्या लाठीचार्ज आणि दबाव तंत्रानंतर देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. अशा विद्यार्थ्यांना हिम्मत देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळावारी रात्री दिल्लीत दाखल झाले. ते थेट जंतरमंतर येथे पोहोचले. यावेळी विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांनी हात धरून त्यांना व्यासपीठावर नेले आणि महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येथे आले आहेत असे म्हणत मोबाईल टॉर्च उंचावून सर्वांनी स्वागत केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनामुळे भेदाच्या भिंती तुटल्या असून देशाची भावना एक झाली आहे असे म्हणत ‘वन नेशन, वन इमोशन’ अशी घोषणा दिली.
#WATCH | Delhi | Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray reaches the protest site at Jantar Mantar. pic.twitter.com/wkPrhCvq7k
— ANI (@ANI) July 21, 2026
“मी इथे फक्त बोलण्यासाठी आलो नाही, तर युवा शक्तीला वंदन करण्यासाठी आलो आहे. राजकारणात संघर्ष तर रोजचाच असतो, पण कधी कधी असं वाटतं की, आपण नक्की कोणासाठी लढत आहोत. पण आज माझं मनोबल उंचावलं आहे, कारण अभिजीत तुम्ही एक ठिणगी पेटवली आहे. आणि ही ठिणगी आता सहजासहजी विझणारी नाही, आम्ही ती विझू देणार नाही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, मला इथे येण्याची काही गरज भासणार नाही. पण स्वातंत्र्यानंतर बहुधा पहिल्यांदाच आपण हे पाहतोय आणि अनुभवतोय की, असं एक सरकार आलंय जे आपल्याच भविष्यावर लाठ्या चालवत आहे. तुम्ही केवळ तरुण नाही आहात, तर तुम्ही या देशाचं भविष्य आहात. आणि मी त्या महानुभावांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी ही ठिणगी, जी मला विझली आहे, असं वाटत होतं, ती पुन्हा पेटवली”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या आंदोलनाची ठिणगी, ही आग विझता कामा नये! उद्धव ठाकरेंचा विद्यार्थी आंदोलनकर्त्यांशी संवाद pic.twitter.com/ZliaS56V2X
— Saamana Online (@SaamanaOnline) July 21, 2026
“आपण सगळे सोबत आहोत आणि कदाचित बऱ्याच वर्षांनंतर जे धर्माच्या भिंती उभ्या करून आपल्या देशाचे तुकडे करू पाहात होते, आज त्या सगळ्या भिंती तुटल्या आहेत आणि देशाची सर्व ताकद, देशाची भावना एक झाली आहे. ‘वन नेशन, वन इमोशन’ अशी सगळ्यांची भावना एक झाली आहे. त्या भावनेसह आपण सगळे एक आहोत आणि एक राहणार आहोत, शेवटपर्यंत एक राहणार आहोत”, अशा जबरदस्त शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
VIDEO | At the CJP protest site at Jantar Mantar, Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray (@uddhavthackeray) says, “I have not come here to make a speech, but to bow down in front of youth power… This spark is not going to go off, probably for the first time after independence… pic.twitter.com/90AekDVlvZ
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2026
उद्धव ठाकरे म्हणाले की, “सर्वात आधी, ज्यांनी तुम्हाला झुरळ म्हटलं, त्यांना मी सांगू इच्छितो की हा देश काही झुरळांचा देश नाही. हा देश झुरळांनी बनवलेला नाही. त्या काळात जे तरुण होते, ते तुमच्याच वयाचे होते. ज्यांना आपण अभिमानाने क्रांतिकारक म्हणतो, जर त्यांनी बलिदान दिले नसते, तर आज आपल्याला स्वातंत्र्य पाहायला मिळाले नसते. काही लोक असेही होते जे आंदोलकांना दहशतवादी मानायचे आणि आता मलाही असंच वाटू लागलंय की, जे लोक तुम्हाला दहशतवादी म्हणतात, ते काय परदेशातून आले आहेत का? तुम्हाला दहशतवादी कोण म्हणतंय, हे तुम्हाला माहीत आहे. हे सरकार तुमच्याशी किती निर्दयीपणे वागत आहे, याचा अनुभव तुम्ही आज घेत आहात.”
ते म्हणाले की, “काल ज्या प्रकारे त्यांनी तुम्हाला मारहाण केली, त्यात एक गोष्ट चांगली वाटली ती म्हणजे, तुमच्या सर्वांच्या हातात मोबाईल फोन आहे. मी कालपासून पाहत होतो की, काही गुंड तुमच्यावर लाठ्या चालवत होते, आणि अभिजीत, मी पाहिलं की तुम्ही एका गुंडाचा फोटो व्हायरल केला आहेस. वॉन्टेड, अगदी असंच करा. कुठे जातील हे लोक? आज कदाचित ते सत्तेच्या खुर्चीवर बसले असतील, पण उद्या त्या खुर्चीवर तुमच्यापैकीच कोणीतरी बसणार आहे, तुमच्यापैकी अनेक जण बसणार आहेत, तेव्हा आपण सर्वांना बघून घेऊ. यांना कदाचित हे माहीत नसेल की, आजचा दिवस निघून जाईल, पण येणारे दिवस माझ्यासमोर उभे आहे, तेव्हा आपण त्यांना बघून घेऊ. मी सर्वांचे आभार मानतो, विशेषतः अभिजीतचे आभार मानतो की, त्याने यासाठी पुढाकार घेतला. हा काही दहशतवाद नाही, अभिजीत तर तिथे त्याच्या शिक्षणात व्यस्त होता. तो अमेरिकेत होता, त्याला इथे येण्याची काय गरज होती? पण माझ्याच देशात माझ्या सहकाऱ्यांवर अन्याय होतोय हे त्याला पाहवलं नाही. कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. मला वाटतं इथे त्यांचे फोटो लावले आहेत. ते एक गाणं आहे, ‘जरा याद करो वो कुर्बानी’… ते स्वातंत्र्यासाठी लढले होते, आपले जवान जे सीमेवर उभे आहेत, जे आपल्यासाठी लढतात, पण माझ्या या स्वतंत्र देशातील मुले पेपरफुटीमुळे आत्महत्या करत आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. ठीक आहे, निवडणुकांना अजून दोन-तीन वर्षे आहेत, असू देत. म्हणजे आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आता तर कुठे सुरुवात झाली आहे, आता आपला लढा सुरू झाला आहे.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “केवळ एका राजीनाम्याने चालणार नाही, तर संपूर्ण यंत्रणाच बदलावी लागेल. जर आपण एका व्यक्तीला बाहेर काढले, तर त्याने काहीही साध्य होणार नाही. जोपर्यंत आपण सरकार बदलत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनात कोणताही बदल घडणार नाही. आणि मी तर पहिल्या दिवसापासून हेच सांगत आलो आहे की, तुम्ही लोक दिल्लीत ठामपणे उभे राहा. माझा प्रयत्न असा आहे की, या आंदोलनाची ठिणगी संपूर्ण देशभरात पेटली पाहिजे आणि याची सुरुवात आपण महाराष्ट्रातून केली आहे. महाराष्ट्र तर तुमच्या पाठीशी उभा आहेच, आणि मला अभिमान आहे की, महाराष्ट्राचा एक तरुण तुमच्यासोबत राहून नेतृत्व करत आहे. तुमच्यासोबत जेवढे तरुण आहेत, कोण कुठून आले आहेत, या सर्वांशी माझे अधूनमधून बोलणे होत असते. आदित्य ठाकरेंसोबत जेव्हा यावर चर्चा होते, तेव्हा मी त्यांच्याशीही बोलत असतो.”
ते म्हणाले, “मी सर्वांना शुभेच्छा आणि हिंमत देण्यासाठी इथे आलो आहे. तसेच तुमच्याकडून हिंमत घेण्यासाठीही आलो आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. काल तुम्ही सर्वांनी जे धैर्य दाखवले, त्याला मी नमन करतो, वंदन करतो, आपण सर्व एकत्र आहोत. आणि ज्यांना आपल्या देशाची फाळणी करायची होती, जे धर्माची भिंत उभी करत होते, बहुधा बऱ्याच वर्षांनंतर आज त्या सर्व भिंती कोसळल्या आहेत. राष्ट्राची ताकद, राष्ट्राची भावना हीच आहे की, आपण एक आहोत. वन नेशन, वन इमोशन. सर्वांची भावना एकच आहे आणि याच भावनेने आम्ही तुमच्या सोबत आहोत, कायम सोबत राहू आणि शेवटपर्यंत लढू.”




























































