
जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधक रस्त्यावर उतरले असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी थेट पंतप्रधान मोदींच्या घराला घेराव घातला. फक्त धर्मेंद्र प्रधानच नव्हे, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी मोदींच्या घराबाहेर ठिय्याच दिला. पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह खासदारांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये कोंबले. याचा निषेध म्हणून काँग्रेसचे सर्व खासदार बुधवारी संसदेत काळे कपडे घालून दाखल झाले.
राहुल गांधी हे देखील काळे कपडे घालून संसदेत दाखल झाले असून ‘इंडिया आघाडी’चे खासदार संसद परिसरात मकर द्वाराजवळ आंदोलनही करणार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहे. तत्पूर्वी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये विरोधी खासदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनातील रणनीती ठरवली जाणार आहे.





























































