
पेरूच्या अँडीज प्रदेशात 5.5 रिश्टर स्केलता तीव्र भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात 5 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून 300 हून अधिक लोक बेघर झाले आहेत. बाधित भागांमध्ये नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. बेपत्ता लोकांची नेमकी संख्या सध्या अज्ञात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार 9.24 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू हुआंकायो प्रांतातील सिकाया शहराच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 2 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के 10 किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. भूकंपाची खोली कमी असल्यामुळे, आजूबाजूच्या परिसरात त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवले, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या, तर अनेक घरांना मोठ्या भेगा पडल्या. स्थानिक चर्च आणि कॉन्व्हेंटचेही नुकसान झाले. पेरू ‘पॅसिफिक रिंग ऑफ फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक प्रदेशात वसलेला आहे, म्हणूनच येथे भूकंप वारंवार होतात.





























































