‘३ इडियट्स’ हा चित्रपट सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित नाही! – आमिर खान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
aamir-akhan-clarifies-3-idiots-phunsukh-wangdu-character-not-based-on-sonam-wangchuk

लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आयोजित प्रश्नोत्तरीवेळी अभिनेता आमिर खान सहभागी झाला होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया विचारली. या संवादाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘३ इडियट्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात आमिर खानने फुन्सुख वांगडू (रॅन्चो) ही भूमिका साकारली होती.

आमिर खान म्हणाला की, ‘३ इडियट्स’ चित्रपट तयार होत असताना त्याला किंवा चित्रपटाच्या लेखकांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

‘३ इडियट्स’ हा चित्रपट सोनम वांगचुक यांच्या जीवनावर आधारित नसल्याचे आमिरने स्पष्ट केले. ‘नाही, हे खरं नाही. हा एक गैरसमज आहे. आम्ही ‘३ इडियट्स’ हा चित्रपट करत होतो, तेव्हा मला सोनमजींबद्दल काहीच माहिती नव्हती. मी सांगू इच्छितो की, ना राजू (राजकुमार हिरानी), ना अभिजात (अभिजात जोशी), जे या चित्रपटाचे लेखक आहेत, आणि ना मी… आम्हाला सोनमजींबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, सोनमजी जे काम करत आहेत ते निश्चितच चांगले आहे. आम्ही त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा आदर करण्यासाठी ते ‘३ इडियट्स’मधील पात्रावर आधारित असण्याची गरज नाही’, असे तो म्हणाला.

वांगचुक यांच्याबाबतची चर्चा मंगळवारी पुन्हा सुरू झाली. ‘३ इडियट्स’मध्ये काम केलेल्या ओमी वैद्य यांनी त्यांच्या एक्स वर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की, चित्रपटातील आमिर खानचे पात्र हे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर आधारित होते. तसेच, वांगचुक यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीकडे लोकांनी लक्ष द्यावे’, असे आवाहनही त्यांनी केले होते.

‘मी नुकताच चतुरचा (ओमी वैद्य यांनी साकारलेल्या पात्राचा) व्हिडीओ पाहिला… पण तो चुकीचे बोलत आहे,’ असे आमिर खानने पुढे सांगितले.

शेवटी आमिर खानने सोनम वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचे आवाहन केले. ‘त्यांच्या प्रकृतीबद्दल आपणा सर्वांनाच खूप चिंता वाटत आहे. हे सर्व चांगल्या प्रकारे संपावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांनी उपोषण सोडावे आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, अशी आमची सर्वांची इच्छा आहे’, असे तो म्हणाला.

नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)ने दिलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर, २८ जूनपासून सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण करत आहेत.