डॉ. कूमार सप्तर्षी पंचत्वात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि सत्याग्रही मासिकाचे संपादक डॉ. कूमार सप्तर्षी यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी कूमार सप्तर्षी यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव डॉ. कबीर सप्तर्षी लंडनहून परतल्यावर दुपारी अंत्यविधी पार पडला. याप्रसंगी असंख्य मान्यवर व कार्यकर्त्यांनी ‘डॉ. कूमार सप्तर्षी अमर है’ असा नारा दिला.

कोथरूड येथील गांधी भवनमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. असंख्य मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डॉ. कबीर सप्तर्षी, सून डॉ. दीप्ती, भाऊ डॉ. प्रवीण सप्तर्षी, बहीण लता ऋषीपाठक व बहीण बडवे, नंदा पाटील यांची अनेकांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण केली. दि. 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, आदींनी डॉ. सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण केली.