आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी, सांगली पाटबंधारेची कर्नाटक शासनाला विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या धरणक्षेत्रात तसेच मुक्त पाणलोटक्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत असून, आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी दिली.

 

आज सकाळी 8 वाजता ‘हिप्परगी बॅरेज’ची पाणीपातळी 552.60 मीटर असून, पाण्याची आवक 36,400 क्युसेक, तर जावक 34,450 क्युसेक आहे. बॅरेजमध्ये 3.98 टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी 3.18 टीएमसी उपयुक्त आणि 0.80 टीएमसी मृत साठा आहे. कोल्हापूर पद्धतीच्या राजापूर येथील बंधाऱयात पाणीपातळी 524.483 मीटर असून, तेथून 35,208 क्युसेक विसर्ग सुरू आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत, अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे.

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.00 ते 517.50 मीटरदरम्यान राखण्याचीही विनंती करण्यात आली आहे. सध्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.680 मीटर असून, धरणात 40,173 क्युसेक आवक व 16,458 क्युसेक विसर्ग सुरू आहे. गतवर्षीच्या अनुभवावरून जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त असते. सन 2026मध्ये ‘अल निनो’च्या प्रभावामुळे काही भागांत दुष्काळ, तर काही भागांत अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास कृष्णा नदी प्रवाहित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने आंतरराज्य बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून नेहमीप्रमाणे सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहित राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत, अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे.