वैधानिक समित्यांच्या बैठकीचे थेट प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार व बेस्टसह सर्व वैधानिक समित्यांच्या बैठकीचे कामकाजही युट्यूबच्या माध्यमातून नागरिकांना थेट पाहता यावे, यासाठी  शिवसेनेने आज ठराव मांडला.  हा ठराव पालिकेच्या सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला.

महापालिकेच्या कामकाजाकडे देशासह जगाचे लक्ष असते. महासभेप्रमाणेच वैधानिक समितीच्या बैठकीचेही थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली. या समित्यांच्या बैठकींना आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभागप्रमुख व समिती सदस्य उपस्थित असतात. यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेले प्रश्न, प्रशासनाने दिलेली उत्तरे प्रत्यक्ष पाहता येईल.

तसेच निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास व पालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांमध्ये विश्वास दृढ होण्यास मदत होईल, असे त्यांनी ठरावात म्हटले. त्यावर महापौर रितू तावडे यांनी संबंधित समित्यांच्या बैठकीचे नियमित थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.