
समृद्धी महामार्गावर वर्ध्यातील विरूळ गावाजवळ पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरकडे जाणाऱ्या एका कारला मागून भरधाव येणाऱ्या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भयंकर होती की, अपघात होताच कारने अचानक पेट घेतला आणि आगीच्या मोठय़ा ज्वाळा उसळल्या. या दुर्घटनेत कारमधील चार जणांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि ते आतच जिवंत होरपळले, तर धडक देणाऱ्या मालवाहू वाहनातील दोन व्यक्तींचाही मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघातात एपूण सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आयशर ट्रकचा चालक संजय कुमार (30, उत्तर प्रदेश), वाहक समरजित पाल (24, उत्तर प्रदेश) यांच्यासह कारमधील जानवी राजेश टिपले (21), सुषमा राजेश टिपले, राजेश आनंदराव टिपले आणि अंकुश राऊत यांचा समावेश आहे. या मार्गावर रविवारी रात्री इथेनॉल वाहून नेणारा एक टँकर उलटला होता. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती.
राजेश टिपले यांना दोन जुळ्या मुली होत्या. त्यापैकी एका मुलीला पुण्यातील एमबीए कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी राजेश टिपले त्यांची पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन महाविद्यालयात गेले होते. मुलीला निरोप घेऊन ते वर्धा येथे जाण्यासाठी निघाले, मात्र तो अखेरचा निरोप ठरला.





























































