
देवाभाऊंची कर्जमाफी वेळेत मिळाली असती तर कदाचित गावंडे पितापुत्रांचा जीव वाचला असता. कर्जमाफीच्या अटी-शर्तीची चिवडाचिवड, दरवर्षी होणारी नापिकी याला कंटाळून पारखेड येथील संतोष गावंडे आणि त्यांचा मुलगा अक्षय या दोघांनी कांदाचाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
संतोष हरिश्चंद्र गावंडे (52) यांची जळका भडंग शिवारात शेती आहे. रविवारी ते शेतात गेले. कांदाचाळीच्या लोखंडी अँगलला त्यांनी गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी वडील घराकडे परतले नाहीत म्हणून मुलगा अक्षय (30) बघण्यासाठी गेला असता त्याला कांदाचाळीत वडील लटकलेल्या अवस्थेत आढळले. हे पाहताच अक्षयने आपल्या मित्रांना मोबाईलवरून ही माहिती दिली आणि आपणही आत्महत्या करत असल्याचे सांगितले. वडिलांच्या शेजारीच अक्षयनेही गळफास घेऊन आपले जीवन संपवले. अक्षय गावंडे याच्या पश्चात पत्नी तसेच दोन लहान मुले असून, कुंटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शेतकरी पिता-पुत्रांनी गळफास घेतल्याची बातमी पसरताच पारगाव शिवारात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच खामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या दुहेरी आत्महत्येमागे नापिकी, कर्जाचे ओझे हेच कारण असल्याचे सांगण्यात आले.





























































