स्वयंपाक घरातील तेल किती दिवस वापरणे सुरक्षित असते, जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

स्वयंपाकासाठी वापरले जाणारे खाद्यतेल महिनोनमहिने टिकते, त्यामुळे अनेकजण एकदा तेल विकत घेतल्यानंतर ते संपेपर्यंत वापरत राहतात. मात्र, इतर अन्नपदार्थांप्रमाणेच खाद्यतेलालाही ठरावीक शेल्फ लाइफ (वापरण्याची सुरक्षित कालमर्यादा) असते. योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास तेल लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे केवळ अन्नाची चवच बदलत नाही, तर आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

 

तज्ज्ञांच्या मते, तेल दूध किंवा ब्रेडप्रमाणे लगेच खराब होत नाही. मात्र, ऑक्सिजन, उष्णता आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास त्यामध्ये ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तेल शिळे होऊ लागते. अधूनमधून अशा तेलाचे सेवन केल्याने तातडीचा धोका निर्माण होत नसला तरी, दीर्घकाळ खराब तेल वापरल्यास शरीरात फ्री रॅडिकल्स वाढून आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

 

वेगवेगळ्या तेलांची शेल्फ लाइफही वेगवेगळी असते. रिफाइंड व्हेजिटेबल किंवा कॅनोला तेल बंद बाटलीत साधारण एक ते दोन वर्षे टिकू शकते. मात्र, बाटली उघडल्यानंतर ते सहा ते बारा महिन्यांच्या आत वापरणे योग्य ठरते. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल बंद पॅकमध्ये सुमारे दोन वर्षे टिकते, पण उघडल्यानंतर तीन ते सहा महिन्यांत वापरणे चांगले.

 

नारळाचे तेल साधारण दोन वर्षे टिकू शकते, तर तिळाचे तेल उघडल्यानंतर सुमारे सहा महिन्यांत संपवावे. फ्लॅक्ससीड ऑइल बंद पॅकमध्ये सहा ते आठ महिने टिकते आणि उघडल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवणे आवश्यक असते. अ‍ॅव्होकॅडो ऑइलही उघडल्यानंतर सुमारे सहा महिने वापरता येते.

 

तेल खराब झाले आहे की नाही, हे ओळखण्यासाठी त्याचा वास, रंग आणि पोत तपासणे महत्त्वाचे आहे. खराब तेलाला आंबट, कुबट किंवा विचित्र वास येतो. त्याची चव कडवट, आंबट किंवा साबणासारखी वाटू शकते. तसेच तेलाचा रंग बदलणे, तळाशी गाळ साचणे किंवा तेल नेहमीपेक्षा जास्त घट्ट होणे हीदेखील तेल खराब झाल्याची लक्षणे मानली जातात.

 

तज्ज्ञांच्या मते, तेल खरेदी करताना ‘बेस्ट बिफोर’ किंवा ‘यूज बाय’ तारीख तपासावी आणि बाटली उघडल्याची तारीखही लिहून ठेवावी. तेल नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी साठवावे. योग्य साठवणूक आणि वेळेत वापर केल्यास तेलाची गुणवत्ता टिकून राहते आणि आरोग्याचा धोका टाळता येतो.