
नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मोदी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात शिवसेनेने दादर येथील शिवतीर्थावर जोरदार आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणाई एकवटली होती. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावर उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करत त्यांच्यात ऊर्जा फुंकली. “भाजपसमोर वाकणार नाही, झुकणार नाही, कापलं तरी चालेल पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही,” अशी गर्जना करत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी बोलता आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेले २२ दिवस सोनम वांगचुक देशासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपोषण करत आहेत. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने जवळपास २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्यासाठी हे उपोषण सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही एकच मागणी आहे. धर्मेंद्र प्रधान यांना नेमकं कोणतं सोनं चिकटलं आहे की, पंतप्रधान त्यांना पदावरून काढू शकत नाहीत?”
ते म्हणाले की, “आज देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे. इथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांमधून आले आहेत. आपल्या सर्वांचे अनेक विषयांवर एकमत नसेलही, पण देशाच्या भविष्यासाठी आपल्याला एकत्र यावेच लागेल. देशभरातील तरुण आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “देशात एकामागोमाग एक पेपर फुटत आहेत. नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीसाठी दरवर्षी आंदोलन करावे लागते. आज अनेक सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहे नीट नाहीत, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन नाहीत, वीज नाही. सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही. देशाला अशिक्षित ठेवून अंधभक्त बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.”
ते म्हणाले की, “आम्ही अंधभक्त राहू, तर या देशाच्या मातीचे राहू. आम्ही अंधभक्त राहू, तर छत्रपती शिवरायांचे आणि शाहू-फुले-आंबेडकरांचे राहू. ज्यांनी आपल्याला संविधान दिले, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही अंधभक्त होऊ. पण भाजपसमोर वाकणार नाही, झुकणार नाही. आम्हाला कापलं तरी चालेल, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही.”
भाजपवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, “२०१४ पासून त्यांना जे जनमत मिळाले, तेव्हा आपणही त्यांच्यासोबत होतो. आपण एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, पण तिसऱ्यांदा फसू शकणार नाही. देश बदलण्यासाठी त्यांना जनमत मिळाले होते, पण आज तेच लोक संविधान बदलायला निघाले आहेत, त्यांना आपल्याला रोखावे लागेल. हे बहुमताचे सरकार असले, तरी ते देशाची परिस्थिती बदलण्याऐवजी संविधान बदलत आहे.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “देशात आज काय चालले आहे? नुकतेच वृत्तपत्रात आले आहे की ‘इस्रो’च्या जवळपास १०० शास्त्रज्ञांनी राजीनामे दिले आहेत. सरकारला इस्रो सांभाळता येत नाही, पण दुसऱ्या पक्षाचे खासदार मात्र फोडता येत आहेत. दुसरीकडे, रोज वृत्तपत्रात कंपन्यांमधून २०-३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याच्या बातम्या येतात. जागतिक बँकेच्या मते, पुढच्या १०-१२ वर्षांत १२ कोटी तरुण रोजगारक्षम वयात येतील, पण जगात केवळ ४ कोटी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. उर्वरित ८० कोटी लोकांनी काय करायचे? किती दिवस मोफत रेशनवर जगायचे?”
आदिताय ठाकरे पुढे म्हणाले की, “भाजप आपल्याला सातत्याने धर्म, जात, प्रांत आणि भांडणांमध्ये अडकवत आहे. आज जग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विज्ञान आणि ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेबद्दल बोलत आहे; आणि भाजप आपल्याला ५०-१०० वर्षांपूर्वी कोण महान होतं, यावर भांडत ठेवत आहे. आपण भविष्यासाठी भांडत आहोत, आणि भाजप आपल्याला भूतकाळावर भांडायला लावत आहे.”
ते म्हणाले, “केंद्रातील कोणता मंत्री काम करत आहे? अश्विनी वैष्णव हे ‘रेल’ मंत्री आहेत की ‘रील’ मंत्री? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या काळात पासपोर्टचे रँकिंग घसरले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थव्यवस्था वर जात आहे की खाली, हेच समजत नाहीये. रस्ते बांधता येत नाहीत. सोनम वांगचुक यांना लडाखमध्ये पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी उपोषण करत असताना अटक करण्यात आली होती, कारण तिथेही अदानींना जमिनी हडपायच्या आहेत.”































































