महापालिका म्हणते, मोशीतच कचरा टाकणार! जनतेचा तीव्र विरोध, डेपोशेजारील 16 एकर जागा ताब्यात घेण्याचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोची मर्यादा संपुष्टात आली असल्यामुळे मोशीत कचरा टाकू नये, अशी मागणी परिसरातील नगरसेवकांसह सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करून प्रशासन तूर्तास मोशीतच कचरा टाकण्यावर ठाम आहे. डेपोतील जागा संपल्याने शेजारची सुमारे १६ एकर जागा ताब्यात घेऊन तेथे कचरा डंप करण्याचे नियोजन आहे.

मोशीतील ८१ एकर जागेतील डेपोत १९९१ सालापासून संपूर्ण शहराचा कचरा टाकला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने तेथे डोंगर तयार झाले आहेत. सध्या दररोज १ हजार ५०० टन कचरा जमा होत आहे. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तेथे महापालिकेने वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्टपासून बायो-सीएनजी, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन व कच्चा माल, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, बांधकाम राडारोड्यापासून वाळू, खड़ी, पेव्हिंग ब्लॉक आदी प्रकल्प सुरू केले आहेत. ते काम पीपीपी तत्त्वावर केले जात आहे. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. असे असले तरी कचऱ्याचे डोंगर कमी होताना दिसून येत नाहीत.

कचऱ्याच्या डोंगरामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील प्रशासकीय इमारत कोसळून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे तेथे कचरा वाहतूक करणाऱ्यांना प्रवेश दिला जात नसल्याने कचरा संकलन बंद आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचून कचराकोंडी निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ही अवस्था आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निगडी येथील जुन्या कचरा डेपोत तात्पुरत्या स्वरूपात शहराचा कचरा जमा केला जात आहे.

डेपो बंद करण्यास प्रशासनाची नकारघंटा

मोशीत कचरा नकोच, अशी भूमिका परिसरातील नगरसेवक, नागरिकांनी घेतली आहे. दुर्गंधी, बोअरिंगचे दूषित पाणी, रहिवाशांना होत असलेले आजार, तसेच मालमत्तेचे घसरलेले भाव आदींमुळे डेपोत कचरा टाकू नये, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाला मात्र गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. डेपो बंद केला जाणार नसल्याचे प्रशासनाच्या कृतीवर दिसत आहे. डेपोशेजारील सुमारे १६ एकर जागा कचरा संकलनासाठी निवडली आहे. तेथे नवीन कचरा जमा केला जाणार आहे.

मोशी कचरा डेपो येथे वाहनांची ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कचऱ्याचे डोंगर खाली कोसळणार नाहीत, याची खबरदारी घेऊन कचरा हटवला जात आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ते काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे डेपोत कचरा टाकण्याची कार्यवाही सुरू केली जाईल.

– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका