शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आधारवाडी तुरुंगात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे रविवारी पोलिसांना शरण आला. यानंतर म्हात्रेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने म्हात्रेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची आधारवाडी तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, डॉक्टर मारहाणप्रकरणी रविवारी पोलिसांनी साधना कारंडे हिला अटक केली असून, आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी 20 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. हा संप आणि म्हात्रेला मंजूर झालेला जामीन याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्युमोटो याचिका दाखल करुन घेत शनिवारी यावर सविस्तर सुनावणी घेतली.

या प्रकरणाची गंभीरता आणि संवेदनशीलता लक्षात घेत उच्च न्यायालयाने म्हात्रेसह अन्य तीन आरोपींना महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला जामीन स्थगित केला. तसेच रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रे पोलिसांना शरण न आल्यास किंवा फरार झाल्यास त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायलयाने प्रशासनाला दिले होते. यानंतर रविवारी दुपारी रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पश्चिमेतील एका गर्भवती महिलेला 6 जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीसाठी आणण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर नवजात बालकाला एनआयसीयू उपचाराची आवश्यकता भासू शकते असे डॉक्टरांनी सांगितले. शास्त्रीनगर रुग्णालयात एनआयसीयू बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी महिलेला अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. या कारणावरून डॉक्टर आणि नातेवाईकांमध्ये वाद झाला. यानंतर रमेश म्हात्रे याने रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात म्हात्रेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हात्रेसोबत अन्य तीन आरोपींना अटक करण्यात आली. मात्र म्हात्रे मोकाट होता. मात्र म्हात्रेवर कारवाई करण्याबाबत तीव्र आंदोलन झाल्यानंतर तीन दिवसांनी 9 जुलै त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर 10 जुलै रोजी म्हात्रेला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत जाताच म्हात्रेची प्रकृती बिघडल्याने त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर 13 जुलै रोजी पोलीस कोठडी संपताच म्हात्रेला कल्याण कोर्टाने जामीन मंजूर केला.

म्हात्रेला जामीन मंजूर होताच राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटले आणि राज्यभरातील डॉक्टरांनी संपाचे बंड पुकारले. यानंतर उच्च न्यायालयाने प्रकरणाची गंभीर दखल घेत स्युमोटो दाखल करून घेतला. शनिवारी 18 जुलै रोजी यावर सुनावणी झाली. .यावेळी न्यायालयाने म्हात्रेला रविवार 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. म्हात्रेने आदेशाचे पालन न केल्यास त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश प्रशासनाला देताच रविवारी म्हात्रे पोलिसांसमोर हजर झाला.