परमेश्वराने पंतप्रधानांना स‌द्बुद्धी द्यावी; अभिजीतचे आई-वडीलही उपोषणात सहभागी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनम वांगचुक यांना देण्यात आलेली वागणूक अतिशय क्रूर आणि निर्दयी आहे. देशातील लोकशाही नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असून गुलामगिरीची ही सुरुवात आहे, अशा कडक शब्दांत टीका करत अभिजीत दिपके याच्या आई-वडिलांनी रविवारपासून उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मोदी सरकारने अतिशय निर्दयतेने चिरडले. आज सकाळी साध्या वेशात आलेल्या दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना ताब्यात घेऊन सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दिल्ली उच्च न्यायालयाचे तसे आदेश असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर अभिजीत दिपके याने आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय जाहीर केला.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजीतचे वडील भगवानराव दिपके यांनी सरकारच्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. देशातील लोकशाही धोक्यात आली असून गुलामगिरीची ही सुरुवात असल्याचे ते म्हणाले. देशातील तरुणांचा आवाज राज्यकर्त्यांनी ऐकला पाहिजे, ‘नीट’ पेपरफुटीला जबाबदार ठरवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी, असेही ते म्हणाले.

‘नीट’ पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या पाहून अभिजीत अस्वस्थ झाला. इकडे येऊ नको, इथले सरकार आणि वातावरण चांगले नाही असे आम्ही त्याला बजावले होते. पण त्याने निर्णय घेतला. आता आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले आहे. रविवारपासून आम्ही दोघेही उपोषणाला बसणार असल्याचे भगवानराव दिपके यांनी स्पष्ट केले. राज्यकर्त्यांच्या एवढा निर्दयीपणा कधी बघण्यात आला नाही. तरुणांच्या हक्काकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सोनम वांगचुक यांना पडदा टाकून नेले. सरकारला कशाचा अहंकार आहे, असा संतप्त सवाल अनिता दिपके यांनी केला. ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना लेकरांची काय किंमत? अभिजीतसोबत आम्हीही रविवारपासून उपोषणाला बसणार असल्याचे अनिता दिपके यांनी सांगितले.