नांदेड दुहेरी हत्याकांडाला धक्कादायक वळण; मुलांची हत्या करून शिक्षक पित्याने घेतला टोकाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी शुक्रवारी (17 जुलै) सकाळी पुनेगाव येथील गोदावरी नदीवरील पुलावरून आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह कार नदीत झोकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला ही घटना सामूहिक आत्महत्या असल्याचे मानले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या धक्कादायक निष्कर्षांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे.

नांदेडचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षक सुनील मोरे यांनी आपल्या सारा (12) आणि सुमीत (8) या दोन निष्पाप मुलांच्या छाती व पोटावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून भरधाव वेगाने कार पुलाच्या कठड्यावर आदळवत सुमारे 50 फूट खोल गोदावरी नदीत झोकून स्वतःही आत्महत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

या घटनेनंतर मृत शिक्षक सुनील मोरे यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करून या घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे.

या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. सारा आणि सुमीत या दोन निष्पाप चिमुकल्यांचा नेमका काय दोष होता, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या टोकाच्या निर्णयामागे नेमके काय कारण होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. घटनेपूर्वी शिक्षक सुनील मोरे यांनी वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, केवळ हेच कारण या घटनेमागे होते की आणखी काही वैयक्तिक किंवा अन्य कारणे होती, याचा तपास सुरू आहे.