नागालँडमध्ये पूर आणि भूस्खलन; आठ जणांचा मृत्यू, अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागालँडच्या मोन जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. भूस्खलनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. एसडीआरएफ, आसाम रायफल्स आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि लष्कराची पथकेही मोनकडे रवाना झाल्याची माहिती मिळते.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पूर आणि भूस्खलनामुळे अनेक घरे वाहून गेली, रस्ते बंद झाले असून सार्वजनिक पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. ढिगाऱ्याखालून एका महिलेचा आणि एका पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवार सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अचानक पूर आला आणि सखल भागात पाणी साचले. डोंगराळ उतारांवर दरडी कोसळल्याने मुख्य रस्ते बंद झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली, असे नागालँड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी रुआंगमेई यांनी सांगितले. बाधित भागातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.