Japan Open Final – 7 वर्षांची प्रतीक्षा संपली; सिंधुने इतिहास रचला, जपान ओपन जिंकणारी हिंदुस्थानची पहिली बॅडमिंटनपटू ठरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी इतिहास रचला. जपान ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने जागतिक विजेत्या अकेने यामागुचीचा पराभव करत जेतेपदावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयासह जपान ओपनचे विजेतेपद पटकावणारी ती पहिली हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू ठरली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सिंधूने यामागुचीचा 21-17, 21-17 अशा सरळ गेममध्ये 50 मिनिटांत पराभव केला.

सिंधूसाठी हे जेतेपद अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण 2019 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर तिचे हे पहिलेच मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. या विजेतेपदासाठी तिला तब्बल सात वर्षे वाट पाहावी लागली. तसेच डिसेंबर 2024 मधील सय्यद मोदी स्पर्धेनंतरचे तिचे हे टूरवरील पहिलेच जेतेपद आहे.

पी. व्ही. सिंधू आणि जपानची अकेने यामागुची यांच्यातील हा 30 वा सामना होता. सामन्यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली, मात्र सामना संपल्यानंतर दोघांमधील मैत्रीचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले. पोडियमवर पदक स्वीकारल्यानंतर सिंधू आणि यामागुचीने एकत्र येत एक छान सेल्फी काढला. सामन्यानंतरही त्या दोघी बराच वेळ गप्पा मारताना दिसल्या.

नवी दिल्लीतील जागतिक स्पर्धेपूर्वी मोठा दिलासा

पुढील महिन्यात नवी दिल्ली येथे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी मिळालेला हा विजय सिंधूचा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि अभिमान ओसंडून वाहत होता.