Ratnagiri News – आजीच्या अंत्ययात्रेला दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; आंबा घाटात दुचाकीचा भीषण अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात आज पहाटे एक भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. रामा बाळू माशाळ ( ३०) , रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आंबा घाटातील दख्खन बस थांब्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामा माशाळ हा रात्री सापुचेतळे येथून विजापूरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून निघाला होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास तो आंबा घाटात आला असता, एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चालक वाहनासह पसार झाला. या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने रामाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील रामाला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी देवरुखचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शक सूचना केल्या असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.