Ratnagiri News – रस्त्यावर उभ्या डंपरचे करायचे काय? नंबर प्लेट नाही, रेडियम नाही आणि टेल लॅम्पही नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असणाऱ्या डंपरमुळे अनेकवेळा अपघात होत आहेत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या डंपरना नंबर नसतात.रेडियम लावलेले नसते. पाठीमागचे दिवे गायब असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे असणारे डंपर दिसत नाहीत आणि भीषण अपघात घडतात. वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर उभे असणाऱ्या डंपरचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.

मुंबई-गोवा महामार्ग आणि मिऱ्या -नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे.रस्त्यावर अनेक वेळा ठेकेदारांचे डंपर उभे असतात. अशा डंपरनी सुरक्षित पार्किंग केले पाहिजे. विशेष म्हणजे या डंपरवर नंबर प्लेट,रेडियम आणि गाडी रस्त्यात उभी असल्याचा संदेश देणारे डंपरच्या पाठीमागचे दिवे सुरू असावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. रस्त्यावर उभे असणाऱ्या जेसीबी किंवा डंपर उभे असताना सुरक्षितेची काळजी घेणे आवश्यक आहे. रात्री अंधारात वाहनचालकांना काही अंतरावर असताना समोर उभ्या असलेल्या डंपर किंवा अन्य वाहनांचा अंदाज आल्यास तो स्वतःच्या वाहनावर नियंत्रण मिळवून अपघात टाळू शकतो.

पासिंगच्या वेळी काय पाहिलं जातं?

आज महामार्गावर फिरत असलेल्या डंपरना नंबर नाही, रेडियम नाही तसेच दिवे नसतात मग या डंपरचे पासिंग होते तेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग पासिंगच्यावेळी अशा डंपरचे काय पहातो हा प्रश्न निर्माण होत आहे.