महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याशिवाय, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खराब हवामानाच्या काळात आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासन व हवामान विभागाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.