
ग्रीसमध्ये सिकंदर द ग्रेटच्या 2300 वर्षांहून अधिक जुन्या शाळेचे अवशेष सापडले आहेत. याच शाळेत ॲरिस्टॉटलने आपला शिष्य अलेक्झांडरला शिकवले होते. ग्रीकच्या संस्कृती मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही शाळा उत्तर ग्रीसमधील प्राचीन मॅसेडोनियन शहर मिझा येथे सापडली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना एक इमारत संकुल सापडले आहे. यामध्ये दोन सभागृह, एक क्रीडांगण, एक स्टेडियम, एक व्हरांडा आणि दगडी बाक असलेले एक व्याख्यान सभागृह यांचा समावेश आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की, शाळेची सजावट आणि रचना ही आयगाई येथील अलेक्झांडरचे वडील राजा फिलिप दुसरा यांच्या मॅसेडोनियन राजवाड्यासारखी होती. शाळेच्या संकुलात मोझॅकच्या फरशा आणि खांब होते. सभागृहात उंच व्यासपीठ होते. ही इमारत इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील आहे, असे नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना नाणी, मातीची भांडी आणि लेखणीसुद्धा सापडली आहेत. यावरून असे दिसते की उच्चपदस्थ सरदारांनी तिथे शिक्षण घेतले होते. ही तीच इमारत आहे जिथे अलेक्झांडर द ग्रेटने शिक्षण घेतले होते, असा विश्वास ग्रीकच्या संस्कृती मंत्रालयातील पुरातन वास्तू विभागाच्या निवृत्त संचालिका आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अँजेलिकी कोट्टारिडी यांनी व्यक्त केला आहे. त्या या स्थळावरील उत्खननाचे नेतृत्व करत आहेत.



























































