
एसआयआर प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादात आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेतील गैरप्रकारांवरून प्रियांका गांधी यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत बोचरी टीका केली असून, आयोगाने निवडणुकांमध्ये गैरप्रकार होऊ दिल्याचे म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीवरील मोठा हल्ला असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मतदार याद्यांमध्ये नावे जोडणे आणि वगळणे या एसआयआर प्रक्रियेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांना अंधारात ठेवून सर्व निर्णय एकतर्फी घेतल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जेव्हा निवडणूक आयोगच अशा गैरप्रकारांना वाव देतो, तेव्हा ती केवळ एक प्रशासकीय चूक राहत नाही, तर तो देशाच्या लोकशाहीवर आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर केलेला थेट हल्ला ठरतो,” असे त्या म्हणाल्या.
पारदर्शक निवडणुका ही देशाच्या लोकशाहीची मूलभूत गरज आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीने इतर आयुक्तांनाच निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवल्याने, या प्रक्रियेमागे काही विशिष्ट हेतू तर नाही ना, अशी शंका निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“निवडणूक आयोग ही देशातील सर्वांत महत्त्वाची आणि स्वायत्त संस्था मानली जाते. पण सध्याच्या परिस्थितीत या संस्थेची विश्वासार्हता पणाला लागली आहे. जनतेचा लोकशाहीवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे,” अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.




























































