आम्ही दहशतवादाचे बळी ठरलो आहोत; संयुक्त राष्ट्र महासभेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या बोचऱ्या टिकेला इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी इराणला उद्देशून वापरलेल्या दहशतवादी या शब्दावर तीव्र आक्षेप घेत पेझेश्कियान यांनी म्हटले की, “आम्ही दहशतवादी नसून दहशतवादाचे बळी ठरलो आहोत.”

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संयुक्त राष्ट्र आमसभेत इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले भाषण हे अतिशय आक्रमक आणि थेट होते. या भाषणादरम्यान अमेरिकेच्या शिष्टमंडळाने सभात्याग करून आपला निषेध नोंदवला.

मंगळवारी ट्रम्प यांनी इराणचा उल्लेख दहशतवादी असा केला होता, त्याला उत्तर देताना पेझेश्कियान म्हणाले, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आम्हाला दहशतवादी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात आम्हीच दहशतवादाचे सर्वाधिक बळी ठरलो आहोत. अमेरिका आणि इस्रायलच्या शस्त्रास्त्रांमुळे अनेक निरपराध मुलांचे बळी गेले आहेत.”

इराणने केवळ स्वतःचा बचाव केला आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत गुडघे टेकणार नाही, असे पेझेश्कियान म्हणाले. “आम्ही कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही, आम्ही केवळ आमचे रक्षण केले आहे. आम्ही दहशतवादी नाही,” असे ते म्हणाले.

“ट्रम्प आणि जे आमच्यावर दबाव आणू पाहत आहेत, त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, आम्ही संवाद, मुत्सद्देगिरी आणि वाटाघाटीसाठी तयार आहोत, परंतु बळाचा वापर आम्ही खपवून घेणार नाही,” अशी भूमिका पेझेश्कियान यांनी मांडली.