
बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे ठरते. माशांचा आहारातील समावेश हा त्यापैकी एक पर्याय मानला जातो. माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. हे घटक हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. काही संशोधनांमध्ये नियमितपणे मासे खाणाऱ्या व्यक्तींमध्ये स्ट्रोकचा धोका तुलनेने कमी असल्याचे आढळले आहे. मात्र, केवळ मासे खाल्ल्याने स्ट्रोक टाळता येतो, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
आहारात मासे समाविष्ट केल्याने ट्रायग्लिसराइडची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच हृदयविकाराशी संबंधित काही जोखीम घटकांवरही त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ओमेगा-३ फॅटी अॅसिडमुळे मेंदूच्या कार्यालाही आधार मिळतो.
सुरमई, बांगडा, सार्डिन यांसारख्या काही माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात आढळते. मात्र मासे कसे शिजवले जातात, यालाही तितकेच महत्त्व आहे. जास्त तेलात तळलेले मासे खाण्यापेक्षा कमी तेलात शिजवलेले किंवा ग्रिल केलेले मासे आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात.
माशांचे सेवन आणि स्ट्रोक यांच्यातील संबंधावर विविध अभ्यास झाले आहेत. मात्र स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबत रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, वजन आणि व्यायाम यांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

























































