
अमिताभ बच्चन हे कायम आपल्या चाहत्यांशी या ना त्या कारणाने जोडलेले राहतात. नुकतेच त्यांनी संगीत आणि त्यांचे नाते याबद्दल काही गोष्टी उघड केल्या आहेत. संगीताविषयी पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, संगीत हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून त्याचा थेट संबंध आत्म्याशी जोडला जातो, असे त्यांनी म्हटले आहे. संगीताशिवाय आयुष्य नीरस, रसहीन आणि चवहीन वाटते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर संगीताविषयी लिहिताना त्यांच्याशी असलेल्या या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. “संगीताचा धागा जेव्हा आत्म्याशी जोडला जातो, तेव्हा काळही निरागस होतो. असेच काहीसे माझ्यासोबत घडले आणि आजही मी तो धागा धरून आहे,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
संगीताचे महत्त्व अधोरेखित करताना अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, संगीताशिवाय जीवनात काहीच शिल्लक राहात नाही. त्यामुळे संगीत नसल्यावर जीवनातला रस हरवून जातो. ज्या लोकांनी संगीताचा मनापासून आस्वाद घेतला, त्याला आपल्या आयुष्याचा भाग बनवले, अशा व्यक्तींविषयी आपल्याला अपार आदर वाटतो, असेही त्यांनी नमूद केले. अमिताभ बच्चन यांच्या या भावनिक पोस्टमधून संगीत त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान राखते, याची झलक पाहायला मिळते.





























































