
मुंबईत आलिशान घरांच्या किमती नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी झालेली एक रिअल इस्टेट डील विशेष ठरली आहे. Angel Oneचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश ठक्कर यांनी मुंबईतील जुहू परिसरात तब्बल ₹711 कोटींची प्रॉपर्टी खरेदी करण्याचा करार केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी एखादा फ्लॅट किंवा दोन-चार अपार्टमेंट्स नव्हे, तर चक्क संपूर्ण निवासी टॉवरच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, एम्बसी डेव्हलपमेंट्स लिमिटेडने मंगळवारी दिनेश ठक्कर यांच्यासोबत या व्यवहारासाठी सामंजस्य करार (MoU) झाल्याची माहिती दिली. या करारानुसार जुहू तारा रोडवरील एम्बसी टेरझ्झा या अल्ट्रा-लक्झरी प्रकल्पातील एक संपूर्ण टॉवर ठक्कर यांच्या ताब्यात जाणार आहे. हा टॉवर ग्राउंड फ्लोअरसह सात मजल्यांचा असून त्याचे एकूण सुमारे 63 हजार चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ आहे. या हिशोबाने प्रॉपर्टीची किंमत सुमारे ₹1.13 लाख प्रति चौरस फूट इतकी होते. देशातील एका निवासी युनिटशी संबंधित सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी हा एक व्यवहार असल्याचे सांगितले जात आहे.
एम्बसी टेरझ्झा हा जुहू तारा रोडवर उभारला जाणारा अल्ट्रा-लक्झरी निवासी प्रकल्प आहे. मुंबईतील महागड्या आणि प्रीमियम निवासी भागांमध्ये जुहूची गणना होते. प्रकल्प दोन एकरांहून अधिक जागेवर विस्तारलेला असून येथे सुमारे 50 आलिशान घरांची उभारणी करण्याची योजना आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रकल्पाची अंदाजे ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू (GDV) 3,000 कोटींपेक्षा जास्त आहे. प्रकल्पाची रचना कमी घनतेच्या पद्धतीने करण्यात आली असून पाच टॉवरमध्ये प्रत्येक मजल्यावर केवळ एकच निवासी युनिट असणार आहे. या आलिशान घरांमधून रहिवाशांना समुद्र तसेच मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. मोठ्या आकाराची घरे, इनडोअर गार्डन, वेलनेस आणि लाइफस्टाइल सुविधाही या प्रकल्पात उपलब्ध असतील.
दिनेश ठक्कर यांनी ही प्रॉपर्टी प्रायव्हसी, मोठी जागा आणि समुद्राचं सुंदर दृश्य या कारणांमुळे खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी आपल्या नव्या घराला Angelus असे नाव दिले आहे. या व्यवहारामुळे लक्झरी रिअल इस्टेटमध्ये मोठ्या वैयक्तिक खरेदीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, सामान्यतः कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी घरांच्या व्यवहारात एखादा फ्लॅट किंवा अपार्टमेंट खरेदी केला जातो. मात्र, येथे तब्बल आठ मजली संपूर्ण टॉवर आणि सुमारे 63 हजार चौरस फूट कार्पेट एरिया खरेदी करण्याचा करार झाला आहे.




























































