
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील एका शाळेत सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका २७ वर्षीय तरुणाने शाळेत घुसून चिमुरड्या विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘चिल्ड्रन्स ॲकॅडमी या शाळेत घडली. निशात फातिमा (वय २६) असे मृत शिक्षिकेचे नाव असून, ती गेल्या एका वर्षापासून या प्राथमिक शाळेत शिकवत होती. आरोपी मोहम्मद सौद आणि फातिमा यांच्यात प्रेमसंबंध होते; मात्र काही दिवसांपूर्वीच फातिमाने हे नाते संपवले होते. याचाच राग सौदच्या मनात होता.
सोमवारी सकाळी सौद बॅगेत पिस्तूल लपवून शाळेत आला. त्याने प्रथम फातिमाला खाली बोलावून घेतले आणि त्यानंतर तिला वरच्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये नेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सौद फातिमाचा हात धरून तिला बळजबरीने जिन्यावरून फरफटत वर नेताना दिसत आहे, तर निष्पाप विद्यार्थी भयभीत होऊन हा सर्व प्रकार पाहत होते. फातिमाने स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सौदने तिला जबरदस्तीने वर नेले. शाळेतील एका कर्मचाऱ्यानेही त्यांचा पाठलाग केला होता.
वरच्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये दोघांमध्ये वाद झाला. त्यादरम्यान सौदने अचानक पिस्तूल बाहेर काढले आणि फातिमाच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःवरही गोळी झाडून घेतली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सुमारे चार राऊंड फायरिंग झाले. गोळीबाराच्या आवाजाने शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. शाळेत पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. एका खाजगी शाळेत शस्त्र घेऊन तरुण इतक्या सहजतेने आत कसा पोहोचला, याबाबत शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी केली जात असून त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.




























































