IPL दरम्यान CSK ची गुपितं लीक करून 3 कोटी रुपये कमावले; माजी खेळाडूचा धक्कादायक गौप्यस्फोट, स्टिंग ऑपरेशनमध्ये पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (डीपीएल) मॅच फिक्सिंग करून कोट्यवधी रुपये कमावल्याचा खळबळजनक खुलासा माजी रणजी खेळाडूने केला आहे. पाच वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सची गुपिते लंडन येथील बुकिंना पुरवण्यासाठी आपल्याला प्रचंड रक्कम मिळाल्याचे माजी क्रिकेटपटूने म्हटले आहे. ‘तहलका’ या मासिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिल्ली आणि नागालँडकडून खेळलेला माजी रणजी खेळाडू रचित भाटिया याने आयपीएल आणि डीपीएल दरम्यान गोपनिय माहिती बुकिंना पुरवल्याचे समोर आले आहे. यामुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

डिसेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये हे गुप्त स्टिंग ऑपरेशन पार पडले. या दरम्यान रिपोर्टरने बुकी बनून रचित भाटिया याच्यासोबत अनेकदा संवादही साधला. यावेळी रचित भाटिया याने आयपीएल 2025 दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग 11 ची माहिती लंडन येथील बुकिंना पुरवली. यासाठी त्याने स्नॅपचॅट ॲपचा वापर केला.

एका सामन्याची माहिती पुरवण्यासाठी त्याला तब्बल 60 लाख रुपये मिळाले. अशा एकूण 5 सामन्यांची माहिती दिल्याबद्दल आपल्याला 3 कोटी रुपये मिळाल्याचे रचित भाटिया याने सांगितले. तसेच आपल्याला ही माहिती सीएसकेच्या ताफ्यातील एका खेळाडूकडूनच मिळत असल्याचे भाटिया याने सांगितले. मात्र चेन्नईचा कोणता खेळाडू त्याला ही माहिती पुरवत होता त्याचे नाव समोर आलेले नाही. याबाबत बीसीसीआय किंवा पोलिसांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

डीपीएल, सय्यद मुश्ताक अली अन् लाच देऊन रणजी निवड!

फक्त आयपीएलच नव्हे, तर घरगुती क्रिकेट आणि स्थानिक लीगमध्येही फिक्सिंगचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. दिल्ली प्रीमियर लीग 2026 मध्ये सेंट्रल दिल्ली किंग्जच्या सामन्याची प्लेइंग 11 लीक करण्यासाठी सुरुवातीला 40 लाखांची मागणी करण्यात आली होती. अखेर 3 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या सामन्याची अचूक माहिती 3 लाख रुपयांत पुरवण्यात आली. तसेच 2018-19 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पैशांच्या बदल्यात मुद्दाम दोन वाईड बॉल टाकल्याची कबुली भाटियाने दिली.

स्वत:च्या निवडीसाठीही दिली लाच

स्वतःची नागालँडच्या रणजी संघात निवड करण्यासाठी लाच दिल्याचा तसेच दिल्लीतील शालेय क्रिकेट संघात मुलांच्या निवडीसाठी पैसे उकळल्याचा दावाही या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. दरम्यान, या खळबळजनक वावटळीनंतर दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने तात्काळ भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले आरोप हे पूर्णपणे अनधिकृत आणि प्राथमिक स्वरूपाचे आहेत. कोणत्याही सक्षम प्राधिकरणाने अद्याप यांची सत्यता पडताळलेली नाही. केवळ एका अहवालाच्या आधारे कोणत्याही खेळाडू अथवा फ्रँचायझीवर निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल, असे डीडीसीएने म्हटले आहे.