गुजरातच्या सीमेवरून होणाऱ्या ड्रग्ज तस्करीत भाजपचा सहभाग, पंजाबच्या मंत्र्यांचा गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या सीमेवरून संपूर्ण देशभरात होत असलेल्या ड्रग्जच्या मागे भाजपचा सहभाग आहे, असा गंभीर आरोप पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांनी केला आहे. गुजरातच्या सीमेवरून देशभरात अमली पदार्थ येत आहेत, हे संपूर्ण देशाला माहिती आहे. यामध्ये भाजप सहभागी असून देशातील तरुणांना अमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचे काम केले जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

पंजाबमधील अमली पदार्थांच्या परिस्थितीवर बोलताना चीमा यांनी 2007 ते 2017 या काळातील अकाली दल आणि भाजप सरकारवरही जोरदार निशाणा साधला आहे. या काळात पंजाबमध्ये अमली पदार्थांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढला होता, असा दावा त्यांनी यावेळी केला. ज्यांनी अमली पदार्थ पसरवले, तेच आता अमली पदार्थ संपवण्याची भाषा करत आहेत.

देशातील तरुणांना अमली पदार्थांच्या आहारी लोटत असून आधी तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यात ढकलायचे आणि नंतर अमली पदार्थ संपवण्याचा दिखावा करायचा, हेच भाजपचे काम आहे, असा आरोप हरपाल सिंह चीमा यांनी केला. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चार वर्षांपासून अंमली पदार्था विरोधात सातत्याने काम करत असल्याचा दावा चीमा यांनी केला. आप सरकारच्या काळात पंजाबमधील अमली पदार्थांचे संकट जवळपास संपुष्टात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.