
अमेरिकेतील व्हाईट हाऊसने आता ‘ट्रम्प टीव्ही’ सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. हे एक डिजिटल प्रसारण नेटवर्क असणार आहे. अमेरिकेत तीन मीडिया हाऊसवर ट्रम्प सरकारने बंदी घातल्यानंतर आता ही टीव्ही सुरू करण्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प टीव्ही हा वेबसाइट, फोन, यूट्यूब चॅनेल, मोबाइल अॅप आणि घरातील स्मार्ट टीव्हीवर दिसणार आहे.
व्हाईट हाऊसकडून तीन प्रमुख वृत्तवाहिन्यांवर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकन टीव्ही नेटवर्कने ट्रम्प यांच्या थेट प्रक्षेपणाचे कव्हरेज थांबवले आहे. या वादामुळे ट्रम्प यांच्या नव्या व्हाईट हाऊस हेलिपॅडच्या उद्घाटनाचे आणि संयुक्त राष्ट्र महासभेतील त्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले जात नव्हते. ‘ट्रम्प टीव्ही’ सुरू केल्यानंतर आता या नेटवर्कवर अमेरिकन प्रशासनाशी संबंधित कंटेंट 24 तास स्ट्रीम केला जाईल.
2022 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टथ सोशल’ हे स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. ट्रम्प यांनी सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको या तीन मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या संस्था सातत्याने फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोप व्हाइट हाऊसकडून करण्यात आला होता.


























































