Jammu Kashmir News – रामबनमध्ये दोन पोलिसांचे मृतदेह कारमध्ये आढळले, पोलीस दलात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील रामबन जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी एका उभ्या असलेल्या कारमध्ये पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचे संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘पीटीआय‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बटोत परिसरातील सना भागातील झियारत मोड येथे एक कार संशयास्पदरीत्या उभी होती. स्थानिक रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी गाडीजवळ जाऊन पाहिले असता कारमध्ये दोन पोलीस कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांनाही रामबन येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांनाही दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

कारमध्ये मृत आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख पटली असून फरीद अहमद (हेड कॉन्स्टेबल) आणि मोहम्मद याकूब (सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही रामबन येथील जिल्हा पोलीस लाईन्स येथे कार्यरत होते.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

दरम्यान, दोन्ही पोलिसांचा मृत्यू नेमका कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत झाला याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. विषबाधा, गुदमरून झालेला मृत्यू की अन्य काही घातपात आहे, या सर्व शक्यतांच्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.