
कपड्यांवर तेलाचा डाग पडला की तो सहज निघत नाही. विशेषतः डाग जुना झाला किंवा कपडा ड्रायरच्या उष्णतेतून गेला असेल तर तो काढणे आणखी कठीण होऊ शकते. मात्र काही सोप्या उपायांनी तेलाचा डाग कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. कपड्यावर नुकतेच तेल सांडले असेल तर डाग घासण्याची चूक करू नका. स्वच्छ कापड किंवा पेपर टॉवेलच्या मदतीने अतिरिक्त तेल हलक्या हाताने शोषून घ्या. डाग घासल्यास तेल कपड्याच्या तंतूंमध्ये आणखी पसरू शकते.
डागावर काही थेंब डिशवॉश लिक्विड टाका. बोटांनी ते हलक्या हाताने डागावर पसरवा. त्यानंतर थोडे लिक्विड लॉन्ड्री डिटर्जंट लावून पुन्हा हलक्या हाताने चोळा. डिशवॉशमधील सर्फॅक्टंट तेल आणि ग्रीस सैल करण्यास मदत करू शकतात.
गरज असल्यास डागावर थोडे पाणी टाकून मऊ ब्रश किंवा जुना टूथब्रश वापरता येतो. मात्र नाजूक कपड्यांवर जोरात घासू नका. त्यामुळे कपड्याचे तंतू खराब होऊ शकतात.
डिटर्जंट लगेच धुवू नका
नवीन तेलाचा डाग असल्यास डिटर्जंट काही वेळ कपड्यावर राहू द्या. त्यानंतर कपड्याच्या केअर लेबलनुसार तो धुवा. गरम किंवा कोमट पाणी वापरण्यापूर्वी त्या कपड्याला ते योग्य आहे का, हे लेबलवर तपासा.
डाग गेला आहे का, हे पाहूनच ड्रायर वापरा
कपडा धुतल्यानंतर डाग पूर्णपणे गेला आहे का, हे तपासा. डाग अजून दिसत असल्यास कपडा ड्रायरमध्ये टाकू नका. ड्रायरच्या उष्णतेमुळे डाग अधिक घट्ट बसू शकतो. अशावेळी कपडा हवेत वाळवून गरज असल्यास डाग काढण्याची प्रक्रिया पुन्हा करता येते.
नाजूक किंवा महागड्या कपड्यांवर हा उपाय करण्यापूर्वी कपड्याच्या लपलेल्या भागावर डिटर्जंटची थोडी मात्रा लावून त्याचा परिणाम तपासणे सुरक्षित ठरू शकते.

























































